Join us

Agriculture News : वाशिमच्या शेतकऱ्याने केली घोड्याच्या साहाय्याने डवरणी, हजारोंचा खर्च वाचविला! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 5:49 PM

Agriculture News : घोड्याद्वारे त्यांनी ४ एकर शेती डवरणी करून ३२०० ते ४००० रुपयांची बचत केली आहे.

- विनायक सरनाईकवाशिम : शेतीसाठी अनेक साधनांची आवश्यकता असते. यातही अनेक अवजारे ही महागडी असल्याने शेतकऱ्यांना परवडत नाहीत. यावर मात करत अनेक शेतकरी संबंधित शेतकामासाठी (Farming) जुगाडू अवजारांची निर्मिती करत असतात. सद्यस्थितीत शेतकरी डवरणीसाठी अनेक जुगाडू यंत्राचा वापर करतात. मात्र वाशीम जिल्ह्यातील (Washim) एका शेतकऱ्याने चक्क घोड्याच्या साहाय्याने डावरणीचे काम केले आहे. त्याचा हा प्रयोग चांगलाच चर्चेत आहे. 

आधीच विविध संकटांतून मार्गक्रमण करणारा शेतकरीवर्ग डवरणीला येत असलेला खर्च पाहून अनेक युक्ती लढवून डवरणी करताना दिसून येत आहे. एका शेतकऱ्याने तर चक्क डवरणीसाठी स्वत:जवळ असलेल्या घोड्याचा वापर करून डवरणी केली व आपला खर्च वाचविला. वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वसारी येथील अल्पभूधारक शेतकरी पंढरी वाघमारे यांनी बैलांद्वारे डवरणीकरिता एकरी ८०० ते १०० रुपये येत असलेला खर्च पाहता आपल्याकडे असलेल्या घोड्याद्वारे डवरणी करण्याचे ठरविले. कारण, अनेक जण विविध क्लृप्ती लढवून डवरणी करीत आहेत. त्यांनीही चक्क घोड्याद्वारे डवरणी केली. 

या शेतकऱ्याने एक वर्षापूर्वी घोड्याची खरेदी केली होती. शेत डवरणीसाठी घोड्याचा वापर होऊ शकतो व खर्चही वाचतो म्हणून त्यांनी हा प्रयोग करून पाहिला. घोड्याद्वारे त्यांनी ४ एकर शेती डवरणी करून ३२०० ते ४००० रुपयांची बचत केली आहे. त्यांनी केलेल्या या अफलातून प्रयोगाची परिसरात जोरदार चर्चाही रंगत आहे.

डवरणी म्हणजे काय?

डवरणी म्हणजे शेतीत डवरा करण्याची क्रिया आहे. याने पिकांचा पोत सुधरतो. यासाठी डवरा हे उपकरण वापरले जाते. बैलांचे साहाय्याने हे चालविले जाते.यासाठी बैल कुशल असावे लागतात तसेच चालविणारा अनुभवी असावा लागतो, अन्यथा कोवळ्या पिकांचे नुकसान होऊ शकते. 

टॅग्स :शेतीवाशिमशेती क्षेत्रशेतकरी