वाशिम : यंदा राज्यातील अनेक भागात दुष्काळाची (drought) परिस्थिती पाहायला मिळाली. आता शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र मागील दीड दोन महिने पशुपालकांना चारा टंचाईचा (fodder Shortage) सामना करावा लागला. त्यामुळे आता वाशीम जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२४-२५ साठी वैरण बियाणे वाटप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी लाभार्थीना ६ जुलै २०२४ या कालावधीत पंचायत समितीस्तरावर अर्ज सादर करावा लागणार आहे.
वैरण व पशुखाद्य विकास या सर्वसाधारण योजनेंतर्गत लाभार्थीना १०० टक्के अनुदानावर पशुपालक शेतकऱ्यांसाठी वैरण बियाणे वाटप करणे ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये प्रति लाभार्थी १ हजार ५०० रुपयांच्या मर्यादेत वैरण बियाणे वाटप करण्यात येते. या योजनेच्या अर्जाचे नमुने पंचायत सुमितीस्तरावर पशुसंवर्धन विभागात उपलब्ध आहेत. हे अर्ज स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा पंचायत समितीस्तरावर स्वीकारले जातील. या योजनेचा जिल्ह्यातील गरजू पशुपालक लाभार्थीनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी व पशुसंवर्धन विषय समिती सभापती वैभव सरनाईक व जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी केले आहे.
काय आहे अभियान ? पशुधन उत्पादन प्रणालीमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियान सुरु करण्यात आले. जनावरांच्या चारा आणि खाद्य स्त्रोताच्या तुटवड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे दिले जाते.
कोणत्या जमिनीत घेता येते वैरण? वनक्षेत्र नसलेल्या नापीक, गायरान, गवती कुरणक्षेत्र व पडीक जमिनीवर वैरण घेता येते.
योजनेचे निकष काय? शेतकऱ्याकडे सातबारा, आठ अ असावा. जमीन पडीक, गवती कुरणक्षेत्र असावी. या योजनेत प्रती लाभार्थी १५०० रुपये मर्यादित वैरण बियाणे वाटप करण्यात येते.
कोठे अर्ज करणार? स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा पंचायत समितीस्तरावर पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारले जातात. तेथून उपलब्ध अनुदानानुसार पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज पाठविले जातात.