Join us

अवकाळीने शेतीचे नुकसान, शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 10:22 AM

नाशिक जिल्ह्यातील 104 महसूल मंडळातील शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. 

अतिवृष्टी, अवकाळी, दुष्काळ अशा नैसर्गिक संकटांतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने एक रुपयात पीकविमा योजना सुरू केली आहे. या योजनेतून मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळीपूर्वी 50 टक्के मदत जमा करण्यात आली आहे, तर जिल्ह्यात 39.60 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, पंधरा तालुक्यांतील तब्बल 104 महसूल मंडळातील शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. 

पिकाला संरक्षण मिळावे, म्हणून प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू करण्यात आली. या योजनेत केंद्र, राज्य सरकार आणि शेतकऱ्यांच्या हिश्श्यातून योजनेचा लाभ दिला जातो. यंदा मालेगाव तालुक्यातील 1 लाख 16 हजार खातेदारांनी नोंदणी केली होती. त्यात मालेगाव, निमगाव, दाभाडी, वडनेर, सौंदाणे, झोडगे, कळवाडी, अजंग, जळगाव निंबायती, डोंगराळे, करंजव्हाण, कौळाणे निं., सायणे बुद्रुक अशा 13 महसूल मंडळांतील 97 हजार 665 शेतक-यांनी कापूस, मका, ज्वारी, बाजरी, भुईमूग, मूग, कांदा अशा सात पिकांचा विमा काढला आहे.

मालेगाव तालुक्यात पावसाळ्यात अडीच महिने पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांची पिके करपून नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीकडून तीन टप्यांत नुकसान भरपाई दिली जाणार होती. त्यासाठी मालेगाव तालुका महसूल मंडळाकडून पिकांचे पंचनामे करीत दिवाळीपूर्वी 8 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. मालेगाव तालुक्यातील काही महसूल मंडळातील शेतकयांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईचा लाभ मिळाला आहे, परंतु अद्याप काही मंडळातील शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत असल्याने विमा कंपनीकडे कृषी विभागाकडून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती कृषी अधिकारी भगवान गोंदे यांनी दिली. 

अनुदानाच्या प्रतीक्षेतील मंडले

मका : मालेगाव कळवाडी, मालेगाव व झोडगे, सटाणा : नामपूर. सिन्नर : गोंदे, डुबेरे, देवपूर, पांगरी, वडांगळी, वावी, शहा, सिन्नर, सोनांबे, नांदूरशिंगोटे. नांदगाव : नांदगाव, हिसवळ.कापूस : मालेगाव : दाभाडी, कळवाडी, कौळाणे, मालेगाव, निमगाव, सौंदाणे, वडनेर, झोडगे. नांदगाव : नांदगाव, हिसवळ, न्यायडोंगरी, येवला : अंदरसुल, राजापूर. ज्वारी : देवळा : देवळा, लोहोणेर, उमराणे. येवला : पाटोदा, येवला, राजापूर, अंदरसूल. मालेगाव : कळवाडी, वडनेर, झोडगे, देवळा : देवळा, लोहोणेर, उमराणे, तूर : देवळा : देवळा, लोहोणेर, उमराणे.

बाजरी : मालेगाव : दाभाडी, कळवाडी, कौळाणे, मालेगाव, निमगाव, सौंदाणे, वडनेर, झोडगे, देवळा : देवळा, लोहोणेर, उमराणे. सिन्नर : गोंदे, डुबेरे, देवपूर, पांगरी, वडांगळी, वावी, शहा, सिन्नर, सोनांबा, नांदूरशिंगोटे. नांदगाव : नांदगाव, हिसवळ, न्यायडोंगरी. मूग : नांदगाव : नांदगाव, हिसवळ, न्यायडोंगरी,भुईमूग : मालेगाव : दाभाडी, कळवाडी, कौळाणे, मालेगाव, निमगाव, सौंदाणे, वडनेर. सटाणा : नामपूर. नांदगाव : नांदगाव, हिसवळ, न्यायडोंगरी. सिन्नर : गोंदे, डुबेरे, देवपूर, पांगरी, वडांगळी, वावी, शहा, सिन्नर, सोनांबे, नांदूरशिंगोटे, देवळा : देवळा, लोहोणेर, उमराणे, येवला : पाटोदा, येवला, राजापूर, अंदरसूल. 

टॅग्स :नाशिकशेतीपाऊस