- सुनील चरपे
Agriculture News : जून महिन्याचे वीस दिवस उलटूनही अद्याप पेरणीयोग्य पुरेसा पाऊस (Rain) नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. पहिल्या आठवड्यात झालेल्या हलक्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र त्यानंतर पिकांना साजेसा पाऊसच झाला नसल्याने दुबार पेरणीचे (Crop Sowing) संकट उभे राहिले आहे. कृषी विभाग आणि कृषी तज्ज्ञांनी 100 मिलीमीटर मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका असे आवाहन केले आहे. याचे कारण काय, हे समजून घेऊया....
जूनअखेर अत्यल्प पाऊस झाला असल्याने (जास्तीत जास्त ५५ मिमी व कमीत कमी ५ मिमी) पावसाळा सुरु झाल्यापासून कृषि विद्यापीठातील संशोधक कृषि विभागातील अधिकारी-कर्मचारी सातत्याने शेतकरी बांधवांना सांगत आहेत की, कमीत कमी 100 मिमी. पाऊस पडल्याशिवाय खरीप पिकांची पेरणी करू नका. तरी देखील बहुतांश शेतकऱ्यांनी तरीही अल्प पावसावर पिकांची पेरणी केली आणि आता त्यांच्यापुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.
जमिनीत पुरेसा ओलावा नसला तर बियाणे ! पेरले' तर ते पुरेशा प्रमाणात उगवून येत नाही. धुळ पेरणीनंतर किंवा अत्यल्प पावसाने जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध नसला किंवा बियाणे पेरल्यानंतर विशिष्ट काळात जमिनीत ओलावा निर्माण झाला नाही, तर पेरलेले बियाणे पुरेशा प्रमाणात उगवून येत नाही. पुन्हा पावसाने ओढ दिली तर दुबार पेरणीचे संकट उभ राहते. पिकाला खत दिले असेल तर त्या खतावरील व महागड्या बियाणावर केलेला खर्च वाया जातो. त्यामुळे किमान 100 मिमी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका, असे आवाहन सेवानिवृत्त विद्यापीठ शास्त्रज्ञ डॉ. कल्याण देवळाणकर यांनी केले आहे.
ही साधी गोष्ट करून पहा....
आपल्या शेतात जा, पाऊस पडून गेलेला असेल तर जमिनीतला एक ढेकूळ हातात घ्या, त्याला दाबून पहा, त्यानंतर त्या ढेकळाला फेका, ते ढेकूळ जर समजा फुटले तर समजायचं की जमिनीतले ओल व्यवस्थित आहे. म्हणजेच आपण पेरणी करू शकतो जर एखाद्यावेळी जास्त पाऊस पडला असेल आणि तुम्ही पेरायची घाई करत असाल आणि तरीदेखील तुम्ही हातात घेतलेले ढेकूळ जर फुटले नाही तर मात्र काही दिवस तुम्हाला थांबावे लागेल, कारण त्या जमिनीमध्ये वापसा आलेला नसतो. त्यामुळे पेरणीचा निर्णय घेताना या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक ठरते.