एकीकडे नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे खरिपासह रब्बी पिकाला देखील फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर गंगापूर कालव्याव्दारे रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदे, ऊस त्याचप्रमाणे द्राक्ष आदी पिकांना दिलासा मिळाला आहे.
नाशिक जिल्ह्यात यावर्षी पुस अगदी कमी प्रमाणात पडला आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी टंचाई देखील सुरु आहे. रब्बीची लागवड देखील घटली आहे. मात्र ज्या ज्या ठिकाणी रब्बीची लागवड करण्यात आली आहे. अशा भागात पाण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तसेच पंचक्रोशीतील गावांमधील भूजल पातळीही खालावल्याने शेतकऱ्यांच्या विहिरींनीही तळ गाठला होता. शेती पिकांना पाणी कमी पडले होते. पण आता गंगापूर कॅनलला आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान गंगापूर धरणाच्या कालव्यातून हे आवर्तन सुरु करण्यात आले आहे. तसेच हे आवर्तन 15 ते 20 दिवस राहणार आहे. सिद्ध पिंप्री गावातील जलस्रोत आटल्याने गेल्या एक ते दीड महिन्यापासून सिद्ध पिंप्री ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता. तसेच पाण्याची टंचाई निर्माण झाली होती, मात्र, कॅनलला आवर्तन सुटल्याने सिद्ध पिंप्रीतील पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे. त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
अनेक गावांना दिलासा
गंगापूर कॅनलवर आधारित सिद्ध पिंप्री, आडगाव, विंचूर गवळी, माडसांगवी, ओढा, शिलापूर, खेरवाडी, कसबे सुकेणे, दीक्षी, दात्याने, गिरणारे, दुगाव, मातोरी आदी गावांतील शेतीपिकांना दिलासा मिळाला आहे. गत एक ते दीड महिन्यापासून गावातील जलस्रोत आटल्याने सिद्ध पिंप्री गावातील ग्रामस्थांना दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता. मात्र, गंगापूर कॅनलला आवर्तन सुटल्याने गावातील तळ्यांमध्ये पाणी सोडल्याने आता पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती सिद्ध पिंपरी गावचे ग्रामसेवक दौलत गांगुर्डे यांनी दिली आहे.