नाशिक : काही ठिकाणी पहिल्या टप्प्यातील उन्हाळ कांदा काढणीला सुरवात झाल्याने निवडक बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक होत आहे. आता कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरातील रब्बी हंगामातील पहिल्या टप्प्यातील उन्हाळ कांदा काढणीला सुरुवात झालेली आहे. परिसरातील खरिपाच्या लाल कांद्याची काढणीदेखील पूर्णतः संपली असताना काढणी केलेल्या उन्हाळ कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने काढणी केलेला कांदा शेतकरी विकताना दिसून येत आहेत.
यंदा पिळकोससह परिसरात पावसाळ्यात अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात होणारी पहिल्या टप्यातील उन्हाळ कांदा लागवड ही मोठ्या प्रमाणात केली. परिसरात सर्वत्र पहिल्या टप्प्यातील उन्हाळा कांदा काढणी सुरू असून शेतकरी कांदा चाळीत न साठवता सरळ बाजार समितीत घेऊन जात आहेत. पहिल्या टप्प्यात झालेली उन्हाळ कांद्याची लागवड नोव्हेंबर महिन्यात झाली असून, त्यादरम्यान परिसरात तीन दिवस झालेल्या बेमोसमी पावसाने या लागवडीला फटका बसल्याने प्रथम टप्प्यातील झालेल्या कांदा लागवडीच्या क्षेत्राचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले.
एकरी ५० क्विंटल घट
प्रथम टप्प्यातील कांदा काढणी सुरू असलेल्या कांद्याला उत्पादनात एकरी ५० क्विंटल घट मिळून आली असल्याचे शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. बाजार भाव समाधान- कारक असल्याने उत्पादनात येणारी घट भरून निघत आहे. पुढील पंधरा दिवसांत परिसरातील दुसऱ्या टप्यातील कांदा काढणीला सुरुवात होऊन तो कांदा शेतकरी चाळीत साठवणीला प्राधान्य देतील. तिसऱ्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांची कांदा लागवड केलेली आहे अशा शेतकऱ्यांचा उत्पादनाचा खर्चदेखील भरून निघणार नसल्याचे चित्र एकंदरीत परिसरातील परिस्थिती पाहता दिसून येत आहे.
यंदा परिसरात अत्यंत कमी पर्जन्यमान झाले असल्याने विहिरींची पाण्याची पातळी वाढलेली नाही. विहिरी, कूपनलिका, बोअरवेल यांच्या पाण्याचा अंदाज घेऊन मोठ्या प्रमाणात खर्च करून पहिल्या टप्प्यात कांदा लागवड केली. परंतु त्या दरम्यान झालेल्या बेमोसमी पावसाने या कांद्याला मोठा फटका बसला आहे. उत्पादनात एकरी ५० ते ६० क्चिटलची घट मिळून आली आहे. दुसया टप्प्यातील लागवड झालेला कांदादेखील काढणीवर आला असून तिसऱ्या टप्यातील कांद्याला पाण्याची कमतरता भासत असल्याने हा कांदा पाण्याअभावी सोडून देण्याची वेळ बहुतेक शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. - उत्तम मोरे, कांदा उत्पादक शेतकरी