Join us

Fish Farming : शेततळ्याचा दुहेरी उपयोग, पिकांना पाणी अन् मत्स्यपालन, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 5:17 PM

Fish Farming : शेततळ्यातुन पिकांना पाणी देण्याबरोबरच यातून माशांचे उत्पादन घेतले जात आहे.

- दिगंबर जवादे 

शेतात शेततळे खोदल्यानंतर त्या शेततळ्याचा (Water Farm) उपयोग केवळ पिकांना पाणी देण्यासाठी करतात. मात्र, गडचिरोली (Gadchiroli) येथील शेतकरी चंदू प्रधान यांनी या शेततळ्याचा दुहेरी लाभ घेत आहेत. पिकांना पाणी देण्याबरोबरच यातून माशांचे उत्पादन घेतले जात आहे. त्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. 

चंदू प्रधान यांची आरमोरी तालुक्यातील सायगाव येथे वडिलोपार्जित १३ एकर शेती आहे. या शेतीत ते विविध प्रकारची पिके घेतात. विविध प्रकारचे प्रयोग या शेतीत ते करतात, त्यांचे हे प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी व लाभदर्शक ठरत आहेत. शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच मासेमारीचा (Fish Farming) व्यवसाय करण्याचे ठरविले.

या उद्देशाने प्रधान यांनी ५० बाय ५० फुटांचा स्वखर्चातून टाका तयार केला. या टाक्यात त्यांनी रोहू, कतला, मिरगल प्रजातीचे मासे सोडले. आठ महिन्यांच्या कालावधीत मासे आता जवळपास दीड किलो वजनाचे झाले आहेत. त्यातून त्यांना दोन लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, पाण्याचा दुहेरी उपयोग या माध्यमातून झाला आहे.

शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक चंदू प्रधान हे गडचिरोली येथे नायब तहसीलदार पदावर कार्यरत आहेत. तरीही ते आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत असतात. त्यांनी केलेला मत्स्य शेतीचा प्रयोग केला. त्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन व्हावे, यासाठी प्रधान यांनी माशांना रेडीमेड खाद्य न देता गवत, कुकुस आदी प्रकारचे खाद्य देत आहेत. यामुळे खर्च कमी झाला.

शेतात कडक सुरक्षा 

मासे चोरीला जाऊ नयेत, यासाठी चंदू प्रधान यांनी शेतात रात्रंदिवस पहारेकरी ठेवला आहे. सोबतच अत्याधुनिक दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. अंधार असला, तरीही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद होऊ शकतात. सीसीटीव्हीचे कनेक्शन थेट मोबाइलला जोडले आहे. त्यामुळे तेथील हालचालींवर घरूनच नियंत्रण ठेवता येते. सोबतच जर्मन शेफर्ड प्रजातीचे दोन कुत्रे आहेत. सभोवताल झटका मशिनचे कुंपण करण्यात आले आहे. या सर्व उपायांमुळे या ठिकाणचे मासे चोरण्याची हिंमत चोरटे करू शकत नाहीत.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीपाणीगडचिरोली