कृषीमाल निर्यातदार होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाकडून प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुण्यात 3 जून ते 7 जून असा पाच दिवसाच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या इच्छुक उमेदवारांना या प्रशिक्षणात सहभागी व्हायचं असेल त्यांनी पणन मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र पणन मंडळाच्या सहयोगाने हॉर्टिकल्चर एक्सपोर्टरचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. या पाच दिवसांच्या प्रशिक्षणात फलोत्पादन निर्यात कशी करावी, याबाबत सविस्तर मागर्दर्शन करण्यात येते. राज्यभरात फलोत्पादनमोठ्या प्रमाणावर वाढत असून यासाठी कृषिमाल निर्यातीसाठी महाराष्ट्र पणन मंडळाकडून प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. नवे निर्यातदार घडविणे, विशेषतः महिला वर्ग, यांसह कृषिमालाची निर्यातवृद्धी करणे, शेतकऱ्याच्या शेतमालाचे मुल्यवर्धन जपणे, परकीय चलन प्राप्त करणे असे उद्देश या प्रशिक्षणाचे आहेत.
कोण होऊ शकतं सहभागी ?
तर प्रशिक्षणार्थी सहभागी होण्यासाठी कृषिमालाचे निर्यातदार होण्यास इच्छुक व्यक्तीना विशेषतः महिलांना प्राधान्य राहील. तसेच या प्रशिक्षणासाठी किमान 18 आणि कमाल 50 वर्षांची वयोमर्यादा आहे, तसेच किमान पात्रता 10 किंवा पदवीधर असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
प्रशिक्षण कुठे आणि शुल्क किती?
दरम्यान हे प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गुलटेकडी या ठिकाणी होईल. तर या ठिकाणी येणाऱ्या प्रशिक्षणार्थींना निवासाची व्यवस्था डॉ. व्ही व्ही पाटील इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट वस्तीगृह गुलटेकडी या ठिकाणी करण्यात आले आहे. तर हे प्रशिक्षण मॅग्नेट प्रकल्पांतर्गत नामनिर्देशित FPC, FPO, VCO आणि CMRC च्या महिलांसाठी मोफत असणार आहे.