नाशिक : परागीभवनातून शेती उत्पन्न ३० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे काम मधमाशा करतात. या कामातून मथासारखा अन्नाचा प्रमुख स्रोत निर्माण करतात; मात्र अन्न साखळीत प्रमुखस्थान असलेल्या मधमाशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जंगलात लागणारे नैसर्गिक व मानवनिर्मित वणवे, शेती पिकांवर होणारी रासायनिक फवारणी, निसर्ग आणि चक्रीवादळे यामुळे मधमाशांवरील संकट आता तीव्र स्वरूपात जाणवत आहेत. त्यामुळे नैसर्गिक अधिवासात तयार झालेल्या मधाची विक्री करणाऱ्या आदिवासी बांधवांच्या उपजीविकेवरही परिणाम होत आहे.
नाशिक पश्चिम पट्ट्यासह इगतपुरी तालुक्यातील जंगलांच्या पट्ट्यात विविध प्रकारच्या मधमाशांचे प्रमाण मोठे होते. ते आता दिवसेंदिवस कमी होत आहे. कारण मधमाशा जिथे अन्नाचा स्रोत भक्कम आहे, अशाच ठिकाणी आपले पोळे बनवितात. त्यांचे अन्न म्हणजे मकरंद किंवा परागकण, त्यासाठी त्या परिसरात फुलांचे प्रमाण जास्त असणेही आवश्यक आहे. मात्र वणवे लागत असल्याने अशा वणव्यात ही नैसर्गिक संपदा नष्ट होत आहे. परिणामी नैसर्गिक अधिवासात अशा फुलांचे प्रमाण कमी होत चालले आहे, त्यातच कमी दिवसांत जास्त पीक देणाऱ्या रासायनिक कीटकनाशक फवारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे.
तसेच आग, जंगलातील 'वणवे, मोबाईल टॉवर्समधील विद्युत चुंबकीय लहरी इत्यादी मधमाशा कमी होण्याची प्रमुख कारणे आहेत. जंगलात राहणाऱ्या आदिवासींचे मध संकलन करणे हा प्रमुख व्यवसाय आहे. आदिवासीच्या पिढ्या मध संकलनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. मात्र जंगलतोडीमुळे व वणव्यामुळे मध संकलन करण्याचे प्रमाण खूपच कमी झालेले असल्याने हा व्यवसाय संकटात आला आहे.
मधाचे सेवन करण्याचे फायदे
मधामध्ये आपल्या आरोग्यासाठी पोषक असलेल्या कित्येक घटकांचा मोठ्या प्रमाणात फायदा आहे. मधाच्या सेवनामुळे आपल्या आरोग्याला कॅलरी, प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, फायबर, खनिजे, कॅल्शिअम इत्यादी जीवनसत्त्व मिळतात. परंतु आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टरांचा सल्ला घेणे जास्त फायदेशीर ठरेल. मध सेवनामुळे शरीरातील थकवा कमी होतो, चांगली झोप, रक्तातील शर्करा नियंत्रणात राहते, पचन क्रिया सुरळीत होते, जळजळ कमी होते आदी फायदे आहेत.