Join us

Bogus Tomato Seed : फळधारणा, फुलधारणा अत्यल्प, बागलाणच्या शेतकऱ्यांना बोगस टोमॅटो वाणाचा फटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 5:01 PM

Bogus Tomato Seed : सातत्याने बोगस वाणांच्या तक्रारी येत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. 

नाशिक : बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka) जायखेडा येथील १३ शेतकऱ्यांनी एका नर्सरीतून खरेदी केलेल्या टोमॅटोच्या रोपांना चांगला फुलोरा न आल्याने कमी प्रमाणात फळे आल्याने या शेतकऱ्यांनी नर्सरी व कंपनीकडे तक्रार केली. मात्र, कंपनीने या तक्रारीची दखल न घेतल्याने कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. कृषी विभागाच्या पंचनाम्यात या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे सातत्याने बोगस वाणांच्या तक्रारी येत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. 

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड (Tomato Cultivation) केली जाते. अनेक भागात सद्यस्थितीत उत्पादन निघत असल्याचे चित्र असून काही भागात लागवडीला प्रारंभ झाला आहार. अशातच बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील १३ शेतकऱ्यांनी नामपूर येथून अमेरिकन हायब्रीड सिडस इंडिया प्रा.लि. बेंगलोर कंपनीद्वारे उत्पादित टोमॅटो वाण इन्डामच्या १३२० रोपांची लागवड केली होती. वेळोवेळी औषध फवारणी केली.

मात्र, टोमॅटोच्या झाडांवर फुलोऱ्यासह फळधारणा अत्यल्प प्रमाणात आल्याचे दिसून आल्याने या शेतकऱ्यांनी संबधित नर्सरी मालक व कंपनी प्रतिनिधीकडे तक्रार दाखल केली. पण शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीची कोणतीही दखल संबंधितांनी न घेता उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केली. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. 

कृषी विभागाने या तक्रारीची दखल घेत तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीमार्फत पाहाणी करून नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा केला आहे. पाहणी समितीने तक्रारीत तथ्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास उपोषणाचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे. या बोगस वाणांमुळे या शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. कृषी विभागाने तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीमार्फत पंचनामा केला. पाहणीदरम्यान फुलधारणा व फळधारणा अत्यल्प असल्याचे समितीच्या लक्षात आले. त्याप्रमाणे समितीने अहवाल दिला. आमचे जे नुकसान झाले, त्याची कंपनीने त्वरित भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

अधिकाऱ्यांची शेतावर पाहणी

कंपनीने आमची झालेली नुकसान भरपाई न केल्यास उपोषणास बसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीत मालेगांव उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, तालुका कृषी अधिकारी महाले, कृषी अधिकारी पंचायत समिती भास्कर जाधव, शास्त्रज्ञ सचिन हिरे यांनी बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच तक्रारदार शेतकरी यावेळी उपस्थित होते. 

टॅग्स :टोमॅटोशेती क्षेत्रशेतीनाशिकबागलाण