गडचिरोली : साग व निलगिरीच्या लाकडांना मोठी मागणी आहे. त्यामुळे सदर झाडांची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड येथील शेतकरी सुरेंद्र तावडे हे आपल्या तीन एकर शेतीत निलगिरीची लागवड करून लाखों रूपयाचे उत्पन्न घेत आहेत.
भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले कॅप्टन सुरेंद्र तावडे यांची मेंढेबोडी (वैरागड) येथे तीन एकर शेतजमीन आहे. त्यांनी धान किंवा इतर कडधान्याचे पीक न घेता शेताच्या बांधावर व मोकळ्या जागेत निलगिरीची झाडे लावली. सन 2018 मध्ये लागवड केलेल्या निलगिरीच्या झाडांची चार-पाच वर्षात १० ते १२ फूट उंची झाली. शेतातील काही मोकळ्या जागेत तयार झालेल्या निलगिरीच्या झाडाची तीन महिन्यांपूर्वी तोडणी केली, तेव्हा 1 लाखापेक्षा अधिक उत्पन्न हाती आले. निलगिरीच्या झाडाची फाटे- बल्ल्यासाठी बाजारात मोठी मागणी आहे. आणि दोन महिन्यातच हे कटाई केलेले झाडे पुन्हा बहरले असून दोन वर्षात त्यांचे उत्पन्न दुप्पट होणार आहे.
कमी खर्चात भरघोस उत्पादन
एकदा वनशेतीसाठी झाडाची लावणी केली तर शेतात रासायनिक खते, कीटकनाशके, यासाठी शेतकऱ्याला अजिबात खर्च करावा लागत नाही. सदर शेती दर दोन वर्षांनी कमी जागेत लाखाचे उत्पन्न देते. म्हणून ही नफ्याची शेती ठरत आहे. वनशेती करता वनवृक्षाची गुणवत्तेनुसार व जमिनीच्या प्रकारानुसार निवड केल्यास ही शेती अधिक फायद्याची ठरते.
सन २०१८ मध्ये निलगिरीच्या झाडांची लागवड केली - तेव्हापासून त्या झाडांना खत, पाणी, फवारणी, किंवा इतर खर्च केला नाही. चार वर्षांनी पहिली कटिंग केली तेव्हा 1 लाखाचे उत्पन्न मिळाले. आता दर दोन वर्षांनी कटिंग - करून दुपटीने उत्पन्न मिळत राहील - खर्च मात्र शून्य,
- सुरेंद्र तावडे, शेतकरी, वैरागड (मेंडेबोडी)
प्लायवूड, कागद, वीजनिर्मिती यासाठी सुबाभूळ, बांबू, निलगिरी या वृक्षाच्या लाकडाचा वापर होतो. शेतकुंपणासाठी वृक्षांची तोड होते. शेतकऱ्यांनी शेत कुंपणासाठी शेतीच्या सीमावरती भागात करवंद, चिल्लार, सागरगोटी यांची लागवड करावी,त्यातून पैसा तर मिळतोच शिवाय पिकांचे संरक्षण होते.
- नीलेश गेडाम, तालुका कृषी अधिकारी, आरमोरी