Join us

Ganeshotsav 2024 : कांद्याच्या आगारातील लक्ष वेधून घेणारा कांदा चाळीचा देखावा पाहिलात का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 3:09 PM

Onion Ganpati Decoration : पिंपळगाव बसवंत येथील पल्लवी भगरे यांनी केलेली कांदा चाळीची आरास सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

- गणेश शेवरे

Nashik : सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरु आहे. घरोघरी गणेशोत्सवाचा माहोल आहे. अनेक मंडळांनी वेगवगेळ्या विषयांना अनुसरून आरास केल्या आहेत. पिंपळगाव बसवंत येथील पल्लवी भगरे यांनी केलेली कांदा चाळीची (Onion Ganpati Decoration) आरास सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याचे दुःख मांडणारी हा देखावा सुंदररित्या साकारण्यात आला आहे. 

महाराष्ट्रातील घराघरांत गणपती (Ganeshotsav 2024) विराजमान झाले आहेत. घरगुती गणपती आरास देखील अतिशय चांगल्या पद्धतीने केलेल्या पाहायला मिळतात. वेगवगेळ्या विषयांची मांडणी करून अगदी सध्या पद्धतीने लक्षवेधक आरास सर्वांनाच आवडतात. अशीच काहीशी पिंपळगाव बसवंत येथील कन्येनं साकारली आहे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र अनेकदा बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. या सगळ्या कांदा प्रश्नावर ही आरास बेतलेली आहे. 

नाशिक जिल्ह्यात लासलगाव, पिंपळगाव बसवंत ही कांद्याची मोठी बाजारपेठ समजली जाते. येथील लाखो क्विंटल कांदा निर्यात केला जातो. मात्र निर्यात बंदी केल्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले.यानंतर शेतकरी, शेतकरी संघटनांनी अनेक आंदोलने केली. मात्र निर्यात बंदी सुरूच ठेवण्यात आली. शिवाय निर्यात शुल्क देखील लावण्यात आले. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी पुरता खचलेला आहे. तरी देखील नव्या जोमाने खरीप कांद्याची लागवड सुरु आहे. 

असा आहे देखावा 

या देखाव्यातून कांदा आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मांडला आहे. या देखाव्यात गणेशाची मूर्ती असून दोन्ही बाजूला कांदा चाळ दिसून येत आहे. सोबतच कांदे भरून चाललेला ट्रॅक्टर दाखविण्यात आला आहे. आजूबाजूला कांदा उत्पादक शेतकऱ्याचे शेतीतील फोटो लावण्यात आले आहेत. तर खालील बाजूस 'बळीराजाला सुगीचे दिवस येवोत' अशा आशयाचे पोस्टरही झळकत आहे. 

 

टॅग्स :गणेशोत्सवगणेश चतुर्थी २०२४कांदानाशिकशेती क्षेत्र