Guava Farming : भंडारा जिल्ह्यात (Bhandara District) रोहा, बेटाळा, कोथुर्णा, खमारी, जुनी टाकळी, बेलगाव, मांडवी, मांडेसर व इतर नदीकाठावरील ग्रामीण भाग पेरू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु, सातत्याने पूर, किडींचा प्रादुर्भाव तसेच माकडांचा उपद्रव यामुळे गत काही वर्षांत पेरूच्या बागा विरळ झाल्या आहेत. त्यामुळे गावठी पेरूची (Guava Farming) चव व गोडवा हरपला असून, संकरित व कलमी पेरूवर समाधान मानावे लागत आहे.
२५ वर्षांपूर्वी नदीकाठावरील अनेक गावांत पेरूच्या बागा होत्या. काळ्या सुपीक मातीतील देशी पेरू, संपूर्ण पावसाच्या पाण्यावर पिकलेली बाग. वैशिष्ट्यपूर्ण मातीमुळे येथील पेरूला गोड, रुचकर चव होती. जवळपास प्रत्येकाची बाग होतीच. पहाटे उठून बागेत जायचे. पूर्वी वाहतुकीचे साधने नसल्याने सकाळी डोक्यावरून मोठे टोपले घेऊन भंडारा गाठायचे. वर्षानुवर्षे हा क्रम सुरू होता. लहान बाजार, मोठा बाजार येथे स्वतः शेतकरी पेरू विकत.
प्रत्येक पेरुवाल्यांची जागा अन् ग्राहकही ठरलेले. त्यामुळे खोबरा जाम म्हणून नावानेच प्रसिद्ध असलेले पेरू ग्राहक डोळे झाकून खरेदी करून जादा पैसेही देण्यास ग्राहक तयार असत. दररोज ५० ते ६० शेतकरी डोक्यावर पेरूचे डाले घेऊन विक्रीसाठी जात. पक्का रस्ता नसल्याने सूर नदी ओलांडून गुडघ्याएवढ्या पाण्यातून भंडाऱ्यात दाखल होत. देशी पेरूची जागा कलमी झाडांनी घेतली. त्यामध्ये वेगवेगळे जाती प्रकार आले. गत काही वर्षांत या गावातील पेरूची ओळख हळूहळू पुसली गेली. आता काही मोजक्याच गावात पेरूचे उत्पादन होत आहे.
तथापी त्यातील अनेकांनी रोगकिडीसह माकडांचा उपद्रव होत असल्याने झाडे तोडून टाकली आहेत. यंदा पावसामुळे पेरूच्या उत्पादनावर परिणाम झाला. थंडी वाढली की पेरूचे उत्पादन वाढते. परंतु हवामानातील उष्मा वाढल्यानंतर पेरूच्या प्रतवारीवर परिणाम होतो. या साऱ्या परिस्थितीत यंदा थंडी चांगली पडली तर पेरूचा हंगाम चांगला होईल तसेच दरही चांगले मिळतील, अशी आशा आहे.
फळशेतीला प्राधान्याची गरज
ऑक्टोबरपासून बाजारात येणारे पेरू यंदा उशिरा दाखल झाले. दरम्यान, भंडारा शहरातील बाजारात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील देशी व परजिल्ह्यातील कलमी पेरूही विक्रीसाठी दाखल झाले आहेत. फलोत्पादनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत. त्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान, सवलत व कर्ज दिले जाते. परंतु, माहितीचा अभाव व जागृती नसल्याने बहुतेक शेतकरी याकडे गांभीर्याने पाहत नाही. आइस्क्रीम तसेच पल्प उत्पादकांकडूनही पेरूला चांगली मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत पेरू, सीताफळ यासारख्या निर्यातक्षम फलोत्पादनाकडे वळण्याची गरज आहे.