Join us

अतिवृष्टी अनुदान मिळवण्यासाठी काय कराल? इथ वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 2:25 PM

शेतकऱ्यांना व्हीके क्रमांकावरून आपले नाव तसेच अनुदानाची रक्कम शोधता येईल, असे तहसीलदार अमित भोईटे यांनी सांगितले.

यवतमाळ : जुलै 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीची अनुदान रक्कम राळेगाव तालुक्यातील एकूण चार हजार २२ शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याकरिता एक कोटी 66 लाख 56  हजार रुपये यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्याच्या वाट्याला आले आहेत. शेतकऱ्यांना व्हीके क्रमांकावरून आपले नाव तसेच अनुदानाची रक्कम शोधता येईल, असे तहसीलदार अमित भोईटे यांनी सांगितले.

यापूर्वी तहसील कार्यालयाच्या मार्फत अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात होती, परंतु शासनाने यात बदल केला आहे. तहसील कार्यालयाने बाधित शेतकऱ्यांच्या नावाची यादी पंचनामा नुसार शासनाकडे पाठवले असून शासन परस्पर शेतकऱ्यांच्या खात्यात ती रक्कम जमा करतील, याकरता शेतकऱ्यांना ही केवायसी पूर्ण करून व्हीके क्रमांक म्हणजे विशिष्ट क्रमांक जो आपल्याला आपल्या तलाठ्याकडून प्राप्त होईल, त्यावरून कुठल्याही आपले सरकार केंद्रावरून आपले नाव व रक्कम शोधण्यास मदत होणार आहे. त्यासाठीच हा उपक्रम राबवला जात आहे.

अनुदानासाठी शेतकऱ्यांनी खालील माहिती पूर्ण करणे गरजेचे

आधार कार्ड अॅक्टिव्ह करणे गरजेचे आहे. आपले आधार कार्ड जर इनअॅक्टिव्ह असेल तर लाभ मिळणार नाही. त्याकरिता आपले आधार कार्ड अॅक्टिव्ह करून घ्यावे, तसेच आधार कार्ड सोबत बँक खाते देखील लिंक असणे गरजेचे आहे. याप्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराने आपले अधिकृत अॅक्टिव्ह आधार कार्ड व बँक पासबुक करून घेऊन तलाठ्याकरडून व्हीके क्रमांक घेऊन ई-केवायसी पूर्ण केल्यास संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात आठ ते दहा दिवसांत अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. जुलै 2022 च्या पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांची यादी शासनाकडे पाठवली असून त्यांना मदत दिली जाणार आहे.

सातबारावर जास्त नावे असल्यास काय करावे?

ज्यांच्या सातबारावर एकापेक्षा जास्त खातेदार असतील त्यांची अनुदानाची रक्कम कोणातरी एकाच्या खात्यावर जमा होईल. त्याकरिता सात दिवसांच्या आत संमती पत्र सर्वांच्या सहीनुसार ज्याच्या एकाच्या नावावर रक्कम द्यायची आहे त्याच्या नावाचे ना हरकत संमती प्रमाणपत्र तलाठ्याकडे सादर करावे लागणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करून अनुदान खात्यात जमा करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार अमित भोईटे यांनी केले आहे.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीपाऊसशेतकरी