- दिगंबर जवादे
गडचिरोली : पारंपरिक धान शेतीला तिलांजली देत आरमोरी तालुक्यातील चामोर्शी माल येथील प्रकाश भोयर या प्रयोगशील शेतकऱ्याने पाव एकर शेतात अद्रकाची लागवड केली आहे. या पाव एकरातून सुमारे आठ लाख रुपयांचे उत्पादन अपेक्षित आहे. यासाठी आतापर्यंत जवळपास दीड लाख रुपये खर्च आला आहे. मे महिन्यात अद्रकाच्या (Ginger Farming) कंदांची लागवड केली होती. हिरवेकंच अद्रकाचे पीक लक्ष वेधून घेत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli) प्रामुख्याने धानाचेच उत्पादन घेतले जाते. मात्र, धानाच्या शेतीतून फारसा नफा मिळत नाही. खर्च वजा जाता संसार चालविण्यापुरता पैसे व धान शिल्लक राहिले तेवढेच भाग्य समजायचे. त्यातच पावसाने दगा दिल्यास तेही उत्पादन होत नाही. धानाच्या शेतीतून प्रगती साधने शक्य नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्ह्यातील काही प्रयोगशील शेतकरी नगदी पिकांकडे वळले आहेत. त्यातीलच एक म्हणजे चामोर्शी माल येथील प्रकाश भोयर हे शेतकरी होत. भोयर यांचे जावळीत वैरागड येथे कृषी केंद्र आहे.
भोयर यांना शेतीची आधीपासूनच बरीच तांत्रिक माहिती आहे. त्यांनी अद्रकाची शेती करण्याचे ठरविले. ही शेती कशी केली जाते, हे जाणून घेण्यासाठी ते संभाजीनगर जिल्ह्यातील तांबेवाडी येथे थेट पोहोचले. तेथील शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मे महिन्यात प्रयोग म्हणून पाव एकरात अद्रकाची लागवड केली. अद्रकाला बऱ्यापैकी कंद येण्यास सुरुवात झाली आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच डिसेंबर महिन्यात अद्रक काढणीस तयार होते. मात्र, भाव बघून काढणीचा कालावधी वाढविता येते, जेवढा कालावधी वाढतो, तेवढे उत्पादन वाढते, अशी माहिती शेतकरी प्रकाश भोयर यांनी दिली.
धानाच्या शेतीत फारसा नफा राहिला नाही. धानाची शेती केवळ जीवन जगण्याचे साधन बनले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी इतर नगदी पिकांकडे वळण्याची गरज आहे. यावर्षी प्रयोग म्हणून पाव एकरात अद्रकाची लागवड केली. पुढील वर्षी तीन एकरांत अद्रकाची लागवड करायची आहे.
- प्रकाश भोयर, शेतकरी