छत्रपती संभाजीनगर : राज्यात परंपरागत पद्धतीने जुने आणि नवीन अशी तफावत न करता अद्रकची (आले) सरसकट खरेदी - विक्री (Ginger Market) करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील बाजार समितीला दिले आहेत. यासाठी तातडीने शासन निर्णय जारी केल्या जाईल, बाजार समिती आणि व्यापाऱ्यांनी याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी या निर्णयाची अंमलबजावणी न करण्याऱ्या बाजार समिती, व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा ईशारा मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर पणन मंत्री अब्दुल सत्तार Minister Abdul Sattar) यांची शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या सह शिष्टमंडळाने सिल्लोड येथील सेना भवन मध्ये भेट घेतली. व शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडल्या. त्यावरून अब्दुल सत्तार यांनी वरील आदेश जारी केले. अद्रक चा विषय मार्गी लावल्याने राजू शेट्टी यांनी समाधान व्यक्त केले.
राज्यातील अद्रक व इतर शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी व शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांची सिल्लोड येथे भेट घेतली. या भेटीत मंत्री अब्दुल सत्तार व शेतकरी संघटनेच्या नेत्यांमध्ये वरील विषयावर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.
पुढे बोलतांना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकरी - शेतमजुरांना केंद्रबिंदू मानून राज्यसरकारची वाटचाल सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे व शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांचा शेतमाल त्यांनी बांधावर अथवा बाजारात विकावा यासाठी शेतकऱ्यांना स्वातंत्र्य असेल, असेही ते म्हणाले.