Join us

Crop Cover Grape : पावसापासून द्राक्ष बागेच्या संरक्षणासाठी क्रॉप कव्हर फायदेशीर, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 3:44 PM

Grape Management : हवामान बदलाच्या घटनांमुळे द्राक्षाच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी प्लॅस्टिक आच्छादन प्रभावीपणे मदत करू शकते.

Grape Farming : तापमानात होणारा बदल, पर्जन्यवृष्टी आणि अवेळी पाऊस, गारपीट, दव इत्यादी हवामान बदलाच्या (Rain) घटनांमुळे द्राक्षाच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी प्लॅस्टिक आच्छादन प्रभावीपणे मदत करू शकते. लागवडीखालील क्षेत्र वाढल्याने छाटणीच्या (Grape Farming) तारखांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. त्याद्वारे बाजारपेठेत एकाच वेळी वाढणारी द्राक्षाची आवक मयदित ठेवता येईल. त्याचा बाजारभावातील घसरण रोखण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

बदलत्या हवामान परिस्थितीत प्लॅस्टिक आच्छादन (क्रॉप कव्हर) तंत्रज्ञानाचा वापर करावा. सध्याच्या परिस्थितीमध्ये अवेळी पाऊस असल्याकारणाने द्राक्ष बागेचे नुकसान टाळण्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या प्लॅस्टिकचा किंवा नेटचा वापर (Crop Cover) करावा. पाऊस थांबल्यानंतर हे नेट काढून भविष्यात अवेळी पाऊस आणि गारपिटीपासून द्राक्ष बागेचे संरक्षण करता येईल.

द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढणे आवश्यक आहे. बोद वाफसा स्थितीत राहतील, अशी काळजी घ्यावी. द्राक्ष बागेतील पाने व घडांमधील साचलेले पाणी काढण्यासाठी रिकामा ब्लोअर उलटसुलट बागेत फिरवणे आवश्यक आहे. त्यामुळे आद्रता कमी होण्यास मदत होईल. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी डायफेनकोनॅझोल २५ ईसी @ ०.५ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून या बुरशीनाशकाची प्रतिबंधात्मक फवारणी करावी.

सततचा पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे घडकुज व डाऊनी मिल्ड्यूची समस्या येण्याची दाट शक्यता असल्याकारणाने यावर पुढील उपाययोजना महत्त्वाच्या ठरतील : 

  • घड स्पष्टपणे दिसताच फेलफुटी त्वरित काढून घ्याव्यात..
  • वेलीवर झिंक आणि बोरॉन प्रत्येकी ०.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करून घ्यावी.
  • पालाश (०-०-५०) १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करून घ्यावी. यामुळे वेल सशक्त होण्यास मदत होईल. 
  • एखादे सायटोकायनीनयुक्त संजीवक कमी प्रमाणात फवारून घ्यावे. 
  • पाऊस जास्त झालेल्या परिस्थितीत ओलांडा किंवा खोडावर चाकूने जखम करावी. त्यामुळे सायटोकायनीनची पातळी वाढण्यास मदत होते.

 

- ग्रामीण मौसम कृषी सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :द्राक्षेशेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापन