Grape Crop Cover : एकीकडे परतीच्या पावसाने (heavy Rain)कहर केला असून द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे द्राक्ष बागांसाठी क्रॉप कव्हरचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून द्राक्ष उत्पादक शेतकरी (Grape Farmer) राज्य सरकारच्या मागेल त्याला शेततळेच्या धर्तीवर मागेल त्याला क्रॉप कव्हर योजना राबविण्यासाठी मागणी करत आहेत. सद्यस्थितीत पावसामुळे झालेले नुकसान पाहिल्यानंतर क्रॉप कव्हर द्राक्ष बागांसाठी किती फायदेशीर आहे, हे लक्षात येते.
गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलामुळे (Climate Change) यावेळी येणारा पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक संकटामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. शिवाय मागील दोन तीन वर्षांत अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी बागा टाकत इतर पिकांना प्राधान्य दिले जात आहे. एकीकडे द्राक्ष शेतीत वाढलेला खर्च, मिळणारे कमी उत्पन्न यामुळे शेती जिकिरीची झाली आहे. अशातच गारपीट, अवेळी यायेणार्या पावसापासून संरक्षणासाठी क्रॉप कव्हर महत्वाचे ठरते. यामुळेच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी मागेल त्याला क्रॉप कव्हरची मागणी करत आहेत.
राज्य सरकार गेल्या काही वर्षांपासून राज्यात मागेल, त्याला शेततळे अशी योजना राबवताआहे. याच धर्तीवर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला क्रॉप कव्हर ही योजना राबविण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. मात्र याबाबत राज्य सरकार अद्याप सकारात्मक नसल्याचे दिसते आहे. पहिल्यांदा जेव्हा मागणी करण्यात आली तेव्हा, तत्कालीन कृषी मंत्री दादा भुसे यांनी शंभर हेक्टरवर प्रायोगिक तत्वावर प्लास्टिक आच्छादनाचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र ते देखील मागेच पडले आहे.
क्रॉप कव्हर फायदेशीर
नाशिक जिल्ह्यात द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र अवेळी होणाऱ्या पावसापासून संरक्षणासाठी क्रॉप कव्हर महत्वाची भूमिका बजावते. यामुळेच क्रॉप कव्हर योजना राबविणे फायदेशीर ठरणार आहे. द्राक्ष हंगामात बागांचे संरक्षण महत्वाचे असते. अशावेळी गारपीट, वादळी पाऊस झाल्याने द्राक्ष बागांना मोठा फटका बसत असतो. आगामी काळात राज्यात नवे सरकार आल्यानंतर क्रॉप कव्हरबाबत काय निर्णय होतो, हे पाहावे लागणार आहे.