सध्या अनेक भागात द्राक्ष बाग काढणीचे काम सुरु आहे. अनेक ठिकाणी द्राक्ष बाग ऐन भरात आहेत. अनेकदा द्राक्ष फळे तयार झाल्यानंतर जास्त दिवस ठेवल्यास झाडावर ताण येतो. याचा परिणाम पुढील वर्षीच्या उत्पादनावर देखील होण्याची शक्यता असते. अशावेळी द्राक्ष खरड छाटणीनंतरचे व्यवस्थापन करणे महत्वाचे असते. याच संदर्भात या बातमीद्वारे नेमकं कसं व्यवस्थापन असायला हवं, हे पाहणार आहोत.
खरड छाटणीनंतर ते ४० दिवसांनतर अन्नद्रव्ये व पाण्याचे नियोजन
माती, देठ व पाणी पृथःकरणाच्या अहवालानुसार नवीन बांगेमध्ये नियोजन करताना, सेंद्रिय खत २५ टन प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावे, त्याचबरोबर नत्र ५५ किलो प्रती हेक्टर इतक्या प्रमाणात द्यावे. त्याचबरोबर ५३ किलो प्रती हेक्टर पालाश ३१-४० दिवसांच्या अंतराने छाटणीनंतर द्यावे. तसेच झिंक व बोरॉनची मात्रा २० ते ४० दिवसांच्या अंतरामध्ये द्यावी. पहिल्या ४० दिवसांमध्ये पाण्याचे योग्य व्यवस्थापन सुद्धा गरजेचे असते. ८ ते १२ मीमी बाष्पीभवन प्रती दिवस होत असल्यास ३३ हजार ६०० ते ५५ हजार ४०० लीटर पाणी प्रती हेक्टर इतक्या प्रमाणात सुरुवातीच्या ४० दिवसात द्यावे.
द्राक्ष खरड छाटणीनंतर रोग नियंत्रण
ज्या बागेमध्ये पूर्वी केवड़ा रोगाची लागण झाली होती, त्या बागेमधून रोगाची लागण झालेली जुनी पाने, वाळलेले घड, काड्या गोळा करून जाळून टाकाव्यात. द्राक्षाच्या काडीवर दिसणारे वाळलेले घड, वाळलेल्या काड्या काढून जेथे कट केलेले आहे. त्या जागी बोर्डो पेस्ट लावावी तसेच १ टक्के बोर्डों मिश्रणाची फवारणी करावी.
खरड छाटणीनंतर कीड नियंत्रण
पिठ्या ढेकुण : जर ५ टक्के द्राक्षवेलीवर किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास पूर्व छाटणीच्या वेळी मियोमिल ४० एस.पी. ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात कीड लागलेल्या जागेवर फवारणी घ्यावी.
कोळी : गंधक ८० डब्ल्यू डी. जी. १.५ ते २ ग्रॅम प्रती लीटर पाणी या प्रमाणत फवारणी घ्यावी.
खोडकिड : कीड बाधित वेलींवरील छिद्रे तपासून विष्टा आणि भुसा काढून छिदे लोखंडी गज किंवा तारेच्या सहाय्याने अधिक विस्तीर्ण करून खोड अळी बाहेर काढून मारून टाकावी
उडध्या भुंगेरे : छाटणीनंतर ८ ते १२ दिवसांनी नवीन डोळे फुटण्याच्या अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. या किडीच्या नियंत्रणासाठी लेम्बडा सायलोथ्रीन ५ सी.एच याची ५ मि.ली. प्रती लीटर किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एस.एल. याची ०.३० मि.ली. प्रती लीटर पाणी या प्रमाणात प्रतिबंधात्मक फवारणी घ्यावी.
लेखक : पवन मधुकर चौधरी विषय विशेषज्ञ (उद्यान विद्या) कृषी विज्ञान केंद्र मालेगाव (नाशिक)