Grape Exporters Fraud : द्राक्ष बागायतदारांच्या (Grape Far mers) फसवणुकीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. आतापर्यंत नाशिक विभागातूनच पाचशेहून अधिक शेतकऱ्यांची ५० कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यात चार ते पाच व्यापाऱ्यांचा समावेश असून येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार असल्याचे आश्वासन दिल्याचे द्राक्ष बागायतदार संघाकडून सांगण्यात आले आहे. अन्यथा यानंतर थेट संबंधित व्यापाऱ्यांची ब्लॅकलिस्टच समोर आणणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात (Nashik Grape Farming) ५० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर द्राक्ष शेती केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात (Grape Export) नाशिक जिल्ह्यातून होत असते. मात्र मागील काही वर्षांत द्राक्ष खरेदीच्या नावाखाली व्यापारी शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. शेतकऱ्यांकडून माल खरेदी केल्यानंतर शेतकऱ्याचा मोबदला न देता व्यापारी पसार होत आहेत. याबाबत संबंधित पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हेही दाखल झाले आहेत. आतापर्यंत नाशिक विभागातील पाचशेहुन अधिक शेतकऱ्यांसोबत असा प्रकार घडला असून तब्बल ५० कोटींच्या वर फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर द्राक्ष बागायतदार संघाकडून संबंधित शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. संबंधित व्यापाऱ्यांशी चर्चा केली जात आहे. तसेच फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांकडून माहिती घेतली जात आहे. त्यानुसार आतापर्यंत ७५० हुन अधिक तक्रार अर्ज प्राप्त झाले असून हे प्रमाण केवळ ३० टक्के असल्याचे बागायतदार संघाकडून सांगण्यात आले आहे. तर इतरही फसवणूक शेतकऱ्यांनी पुढे येऊन माहिती द्यावी, जेणेकरून पैसे मिळवता येतील.
द्राक्ष बागायतदार संघाच्या म्हणण्याप्रमाणे द्राक्ष खरेदी व्यापाऱ्यांमध्ये वैष्णवी इंटर प्राइजेस यांच्याकडे जवळपास १ कोटी ४२ लाख रुपये आहेत, यांच्याशी दोन वेळा मिटिंग झाली आहे. त्यानंतर एमजी एक्स्पोर्ट या व्यापाऱ्याने सर्वाधिक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तसेच पूर्वा चव्हाण नामक व्यापाऱ्याने जवळपास १० कोटींची फसवणूक केली असून सध्या युरोपात असल्याचे चित्र आहे. या प्रकरणात युरोपियन युनियनची मदत घेण्यात आली असून स्थानिक पोलिसही मागावर आहेत. याचबरोबर या फसवणूक प्रकरणात इतरही व्यापारी आहेत. काही दिवसांपासून द्राक्ष बागायतदार संघाचे संबंधित व्यापाऱ्यांशी बोलणे चालू आहे, येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत पैसे देण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष तपास पथकाची निर्मिती
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यामध्ये द्राक्ष बागायतदारांची देशांतर्गत व्यापारी, तसेच निर्यातदारांकडून झालेल्या फसवणुकीची माहिती दिली होती. त्यानुसार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना यासंदर्भात लक्ष घालून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार अर्जही मागवले जात आहेत. त्यानुसार तपास सुरु असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे.
ब्लॅकलिस्ट तयार करणार
अध्यक्ष कैलास भोसले यांनी सांगितले की, द्राक्ष बागायतदारांनी द्राक्ष मालाचा व्यवहार हा सौदा पावती अथवा खरेदी विक्री संदर्भातचा कागदोपत्री पुरावा तयार करूनच केला पाहिजे. जेणेकरून संबंधित व्यापारी अथवा खरेदीदार यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यास तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाहीत. या फसवणुकी प्रकरणी संबंधित व्यापाऱ्यांशी बोलणे चालू आहे, येत्या १५ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. यानंतर जर पैसे दिले नाहीत, तर त्या व्यापाऱ्यांची ब्लॅकलिस्ट तयार करण्यात येऊन कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.