एकीकडे द्राक्ष काढणी सुरु असून अनेक भागात द्राक्ष निर्यात सुरू झाली आहे. मात्र एका बाजूला इस्त्रायल-हमास युद्ध सुरु असल्याने नेहमीच्या मार्गावरून वाहतूक सुरु न राहता केप ऑफ गुड होप या मार्गावरून निर्यात केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. दुसरीकडे बांग्लादेशने द्राक्षावरील आयात शुल्कात वाढ केल्याने द्राक्ष निर्यात घटली आहे.
नाशिक जिल्हा द्राक्ष पंढरी म्हणून ओळखला जातो. मात्र यंदा द्राक्ष उत्पादकांना देखील मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यंदा जिल्ह्यात ५८ हजार ४१८ हेक्टर द्राक्षांची लागवड झाली असून सद्यस्थितीत अनेक भागात द्राक्ष काढणी सुरु आहे. एकीकडे द्राक्ष काढणी सुरु असताना दुसरीकडे गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेल्या इस्त्रायल-हमास युद्धामुळे नेहमीचा द्राक्ष निर्यातीचा मार्ग बंद आहे. ती वाहतुक नेहमीप्रमाणे सुएझ कालव्याद्वारे होत असते. मात्र आता ही वाहतूक थेट न्यू केप ऑफ गुड होप केली जात आहे. यामुळे अनेक गोष्टीचा खर्च वाढल्याने साहजिकच शेतकऱ्यांना याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. कमी किंमतीत द्राक्ष विक्री करावी लागत आहे. त्यामुळे येथील ग्राहकांची मागणी असूनही द्राक्ष निर्यात घटल्याचे चित्र आहे.
दुसऱ्या बाजूला बांग्लादेशातही मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात केली जाते. मात्र यंदा बांगलादेशने द्राक्षावरील आयात शुल्कात वाढ केल्याने देशभरातून होणारी द्राक्ष निर्यात घटली आहे. बांगलादेशात सध्या द्राक्षांवर १०६.७६ रुपये प्रतिकिलो आयात शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे दर कमी झाल्याचा थेट फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. एकीकडे बांगलादेशात निर्यात होणाऱ्या संत्र्यांवरील आयात शुल्काच्या ५० टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे संत्र्यांवरील अनुदानाप्रमाणेच द्राक्षावरील आयात शुल्काच्या ५० टक्के अनुदान तत्काळ मंजूर करावे, तसेच सरकारने निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी द्राक्ष उत्पादकांमधून केली जात आहे.
द्राक्ष उत्पादकांना क्रॉप लोन भरणे मुश्किल
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले म्हणाले की, एकीकडे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी अवकाळी पावसासह प्रतिकूल हवामानाशी झुंज देत द्राक्षबागा फुलविल्या. कर्ज काढून लाखो रुपये भांडवल द्राक्ष शेतीत गुंतविले. निर्यात सुरु झाली आहे, मात्र रेट कमी असून 60-65 रुपयांवर असलेला भाव चाळीस रुपयांवर आला आहे. शिवाय तिकडे ग्राहकांची देखील कमी आहे. द्राक्षाला अपेक्षित दर मिळत नसल्याने क्रॉप लोन भरणे मुश्किल झाले आहे. शेतकऱ्याला एक किलोला तीस रुपये खर्च येत आहे, मात्र दुसरीकडे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण आहे. त्यामुळे संत्र्याप्रमाणे द्राक्षाला देखील अनुदानाची मागणी संघटनेतर्फे करण्यात आली असून दोन बैठका रद्द झाल्याने निर्णय होऊ शकला नसल्याची माहिती त्यांनी दिली.