- योगेश बिडवई
शेतकऱ्यांच्या जीवनात गोडवा आणणाऱ्या द्राक्ष पिकाला गेल्या काही वर्षांपासून बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसत आहे. प्रामुख्याने सांगली, पुणे, सोलापूर आणि नाशिकसारख्या भागात द्राक्ष शेतीने शेतकऱ्यांना समृद्ध केले. मात्र, निसर्गाशी दोन हात करण्याबरोबरच, उत्पादनाचा वाढलेला खर्च आणि त्या तुलनेत न मिळणारे भाव तसेच निर्यातीमधील वेगवेगळ्या अडथळ्यांमुळे द्राक्ष बागायतदार कर्जबाजारी झाले आहेत. द्राक्षाचे पीक हे सर्वात खर्चीक आहे. त्यामुळे अतिवृष्टी किंवा गारपिटीने बागा आडव्या झाल्या तर शेतकरी देशोधडीला लागतात.
गेल्या तीन वर्षांपासून खराब हवामानामुळे द्राक्ष पीक तोट्यात आहे. कधी अतिवृष्टीचा फटका तर कधी वाढत्या थंडीने मण्यांना तडे गेले की कमी भावात द्राक्षांची वायनरींना विक्री करावी लागत आहे. आता द्राक्षाचा हंगाम सुरू झाला आहे. ६० ते ६५ रुपये किलो दराने द्राक्षाची निर्यात सुरू झाली आहे. साधारण ७५ ते ८० रुपये किलोने निर्यात झाल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. मात्र, अजून अपेक्षित दराने निर्यात सुरू झालेली नाही. निर्यातक्षम द्राक्षाचा खर्च किलोमागे २७ रुपये आहे. त्यानंतर पॅकिंग, वाहतूक आणि इतर खर्च येतो. मात्र, ऐन हंगाम सुरू होण्याची वेळ आली की आता अवकाळी पाऊस ठरलेला आहे. त्यामुळे पुन्हा वेगवेगळ्या फवारण्यांचा खर्च वाढतो.
येथे आयात शुल्काचे संकट
भारतातून नेदरलैंडनंतर बांगलादेशात सर्वाधिक द्राक्षे निर्यात होतात. मात्र, यंदा बांगलादेशाने ढाक्षावरील आयातशुल्क प्रति किलो १०६. ७६ रुपये केले आहे. त्यामुळे निर्यातीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. बांगलादेशातील निर्यात जवळपास बंदच झाली आहे. बांगलादेशात द्राक्ष निर्यातीसाठी ५० टक्के अनुदान देण्याची बागायतदारांची मागणी आहे. निर्यात वाढल्यास परकीय चलन मिळण्यासही मदत होईल.
समुद्री चाच्यांचे हल्ले
जहाजांवर समुद्री चाच्यांनी हल्ले केल्याचे प्रकार घडले. त्यामुळे सुएझ कालव्याऐवजी आफ्रिकेमार्गे वाहतूक करण्यात येत आहे. परिणामी वाहतूक खर्च १,७०० ते १,८०० डॉलरवरून थेट ६ हजार डॉलरवर गेला आहे. त्यामुळे वाहतुकीचे ५० टक्के अनुदान पुन्हा सुरू करावे, अशीही द्राक्ष बागायतदारांची मागणी आहे.
एकरी शंभर क्विंटल उत्पादन
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाची १९६० पासून वाटचाल सुरू झाली. सध्या ३२ हजारपेक्षा अधिक द्राक्ष बागायतदार संघाचे सभासद आहेत. संघाचे पुणे, नाशिक, सांगली, सोलापूर असे चार विभाग आहेत. महाराष्ट्रात साधारणपणे ४.५० लाख एकरवर द्राक्ष शेती केली जाते. द्राक्षाचे अर्थकारण पाहिले असता एकरी खर्च : १.५० लाख, तर एकरी उत्पादन : १०० क्विंटल (सरासरी) निघत असते. दरम्यान भारतातून विदेशात प्रामुख्याने काही महत्वाच्या देशांमध्ये निर्यात केली जाते. यात नेदरलँड देशात 37 टक्के, बांगलादेशात दहा टक्के, आखाती देशांमध्ये 8 टक्के, युकेमध्ये आठ टक्के, तर रशियामध्ये सहा टक्के निर्यात केली जाते.
शिवार खरेदी आणि फसवणूक
द्राक्षांची कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री होण्याचे प्रमाण नगण्य आहे. द्राक्षांची शिवार खरेदी केली जाते. उत्तरेकडून व्यापारी येतात, द्राक्षाची शेतातच खरेदी करतात. रोजच्या रोज माल देशभर जातो. सुरुवातीला हे व्यापारी काही शेतकऱ्यांना रोख पैसे देतात. एकदा विश्वास बसला की नंतर शेतकऱ्यांचे पैसे बुडवायला सुरुवात होते. व्यापारी फरार होतात. शेतकऱ्यांना कोट्यवधींना फटका बसतो. व्यापाऱ्यांची ना पोलिसांत, ना पणन मंडळाकडे नौद, त्यांच्या आधार कार्डापासून कोणतीही माहिती नसते. त्यामुळे व्यापाऱ्यांवर कारवाई होत नाही.