Join us

द्राक्ष बागेचे लोखंडी अँगल चोरी होण्याचे प्रकार वाढले, द्राक्ष उत्पादक शेतकरी हैराण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 12:17 PM

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष बागांमधील अँगल चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. 

द्राक्ष हंगाम संपला असून सध्या बागांमध्ये खरड छाटणीचे काम जोमात सुरु आहे. एकीकडे यंदा अपेक्षित असा बाजारभाव मिळू शकला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मात्र पुढील हंगामासाठी पुन्हा एकदा नव्याने द्राक्ष बागांचे काम सुरु झाले आहे. हे सर्व सुरु असताना दुसरीकडे द्राक्ष बागांमधील अँगल चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. 

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. यंदाचा हंगाम आटोपला असून खरड छाटणीने वेग घेतला आहे. अशा स्थितीत सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी, सरदवाडी, पांढुर्ली परिसरात गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष बागेचे लोखंडी अँगल चोरी होण्याचे प्रकार वाढले असल्याने द्राक्ष बागायतदार चिंतेत सापडले आहेत. सिन्नर पोलिसांकडे याबाबत तक्रार करूनही चोरट्यांचा बंदोबस्त होत नसल्याने बागायतदारांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

सिन्नर शहरातील गाडे मळा, तालुक्यातील कुंदेवाडी, सरदवाडी, पांढुर्ली, सोनांबे, कोनांबे, विचुंदळवी परिसरात द्राक्ष बागा आहेत. यंदा दुष्काळामळे शेतकऱ्यांनी विकतचे पाणी घेऊन या बागा वाचवल्या असताना, आता या बागांच्या लोखंडी अँगलवर चोरट्यांची वक्र दृष्टी पडली आहे. नुकतेच बाजार समितीचे सभापती शशिकांत गाडे, संजय गाडेकर यांच्या कुंदेवाडी येथील द्राक्ष बागांचे जवळपास 100 लोखंडी अँगल चोरट्यांनी कापून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. 

पोलीस अधीक्षकांना निवेदन तसेच सरदवाडी येथील साहेबराव गाडे यांच्या बागेचेही अँगल चोरट्यांनी कापून नेले. बागेचे कडेला असलेलेच अँगल हे चोरटे कापून नेतात. तसेच कडेच्या अँगललाच तास बांधून आधार दिला जातो. मात्र, चोरटे हेच अँगल चोरून नेत नसल्याने संपूर्ण बागच कोलमडते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांकडून पोलिसांकडे तक्रार करूनही दाद मिळत नसल्याने पोलिस अधीक्षकांना निवेदन देणार असल्याचे गाडे यांनी सांगितले.

टॅग्स :नाशिकशेतीद्राक्षेचोरीसिन्नर