रविंद्र शिऊरकर
बाजारातील प्रवाही मागणी आणि दरातील घसरण यामुळे ग्रीन अप्पल बोरं उत्पादक शेतकरी सध्या या पिकाला कंटाळले असून अनेकांनी आपल्या बागा काढल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांना या पिकासाठी लागणाऱ्या मजुरांच्या समस्येपुढे डोके दुखी उद्भवली आहे.
हिवाळा सुरु झाला की बाजारात बोरं दाखल होतात. पूर्वी गावरान छोटं छोटी बोरं मिळायची. आता त्यांची जागा ग्रीन अँपल बोर या मोठ्या आकारांच्या बोरांनी घेतली आहे. तुरळक मिळणारी हि बोरं सध्या राज्यात अनेक ठिकाणी सहज उपलब्ध होतात. लागवड क्षेत्र वाढली, सोबत वातावरणीय बदलांत किडींचा व बुरशींचा होणारा प्रादुर्भाव वाढला. ज्यामुळे हे पिकं सध्या खर्चिक झाले आहे.
खर्च वाढला, पण बाजार भाव जैसे थे असल्याने या पिकाबाबत शेतकऱ्यांची नाराजी झालेली दिसून येत आहे. खते, औषधी फवारणी, छाटणी, तोडणी, अशा विविध स्तरांवर खर्च वाढला आहे. सोबत मजुरांची तोडणीसाठी मनधरणी करत ने आण करून देखील अपेक्षित तोड दिवसभरात होत नाही. ज्यामुळे पुन्हा खर्चात वाढ होते. अशा एक न अनेक समस्यांपुढे ग्रीन अँपल बोरं या पिकाची शेती करणारे शेतकरी हैराण झाले आहे तर काही शेतकरी आपल्या बागा काढून टाकत आहे.
मागणीच्या तुलनेत उत्पादन अधिक
आमच्या गावात २०१६ ते १८ दरम्यान जवळपास ४० एकर लागवड ग्रीन अप्पल बोरांची झाली होती. सुरुवातीला चांगला दर होता उत्पन्न चांगले मिळायचे. मात्र अलीकडच्या काळात लागवडी खूप झाल्या त्या तुलनेत मागणी नसल्याने आता बाजारभाव मिळत नाही. ज्यामुळे सध्या बोरांची शेती करणारे शेतकरी मानसिक तणावात आहे.
- कैलास मोरे (शेतकरी भामाठाण तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर)
बोरांचे मूल्यवर्धन व्हावे
बोरं खाल्ले की सर्दी खोकला होतो. वातावरण थंड असलं की बोरं खाऊ नये ! अशा अनेक गोष्टींमुळे बोरांची बाजारातील मागणी प्रवाही असते. या बोरांपासून काही प्रक्रिया करून पदार्थ तयार होत नसल्याने तसेच हे बोरं दीर्घ कालावधी करिता टिकत नसल्याने असलेल्या बाजार दराने विक्री करावी लागते.
- रत्नाकर भानुदास सोनवणे (शेतकरी भामठाण तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर)