Join us

पारंपारिक बियाणांपेक्षा संकरित बियाणांकडे वाढता कल, शेतकरी काय म्हणतात? 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 5:52 PM

काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, रोगराई यामुळे धानपिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे.

यावर्षीचा खरीप हंगाम अवघ्या एक महिन्यावर आला असून शेतकऱ्यांनी आतापासून शेतीची मशागत करायला सुरुवात सुरू केली आहे. पेरणीच्या वेळी धान बियाणे, खते दरवर्षी महाग झाले असतात. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. त्यासाठी राज्य शासन व कृषी विभागाने सवलतीच्या दरात धान बियाणे व खत व कर्ज उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, रोगराई यामुळे धानपिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. कापणी व मळणीच्या वेळी पाऊस झाल्यास सदर धान्य भिजत असल्याने ते बियाणांसाठी वापरणे शक्य होत नाही. त्यांना दरवर्षी नवीन बियाणे वापरावे लागते. कोणत्या न कोणत्या कारणाने भातशेतीचे नुकसान झाले तरी संबंधित विभागाकडून आणेवारी मात्र जास्त दाखण्यात येते. त्यातच कमी हमीभावामुळे उत्पादन खर्च मिळत नाही. मागील वर्षी भातशेतीवर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आंला होता. भातपिकाचे नुकसान झाले. शेतकऱ्याला याचा जबर फटका बसला आहे. दर वर्षी सतत होणारी दरवाढ, महागाई त्याचाही परिणाम होत आहे. 

मागील वर्षी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व धानावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाचे अतोनात नुकसान झाले. ते बियाणे पेरणीसाठी शेतकऱ्यांनी ठेवले नाही. शेतकऱ्याच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्याकडे पैसा शिल्लक राहतच नाही, ही वस्तुस्थिती आहे. नवीन बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांजवळ पुरेसा पैसे नाही. पेरणी कशी करावी ही शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या उभी ठाकली आहे. त्यासाठी सवलतीच्या दरात बियाणे खत उपलब्ध करून व अल्प दरात बैंक कर्ज उपलब्ध करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

- नरेश सोमनकर, शेतकरी

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्याला धान उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो. मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात धान पिल्लाची लागवड केली जाते. शेतकरी विविध प्रजातीच्या संकरित धानाची लागवड करीत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बी-बियाणे व खत उपलब्ध करून द्यावे, ही शासनाची जबाबदारी आहे.

- सुरेश नैताम, अध्यक्ष, सेवा सहकारी संस्था.

पारंपरिक बियाण्यांऐवजी संकरित बियाणांचा वापर

पूर्वी शेतकरी आपल्या शेतातील धान्य पेरणी करण्यासाठी वापरत असत. अलीकडे मात्र शेतकरी संकरित व अधिक उत्पादन देणाऱ्या बियाणांची लागवडीसाठी निवड करीत असतात. कृषी केंद्रामध्ये नवनवीन व अधिक उत्पादन होणाऱ्या संकरित वाणाच्या धान बियांच्या पिशव्या उपलब्ध असतात. त्यामुळे शेतकरी सरसकट कृषी केंद्रातून बियाणे खरेदी करून त्याचा वापर पेरणीसाठी करीत असतात.

टॅग्स :शेतीपाऊसभातगडचिरोलीराज्य सरकार