नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 10 महीने 13 दिवस झाले. त्यात आज गुढीपाडव्याचा दिवस असल्याने येथील आंदोलन शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळावर गुढी उभारून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. एवढे दिवस होऊनही अद्याप बँक तथा सरकारकडून कोणतीही ठोस पाऊले उचलली जात नसल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सर्वज्ञात असलेल्या नाशिक जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जापोटी बँकेकडून वसुली सुरु आहे. या वसुलीविरोधात मागील 01 जूनपासून हे शेतकरी आंदोलन सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा शेतकऱ्यांचा लढा सुरु असून अद्यापही हे शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आंदोलनस्थळावर गुढी उभारण्यात आली. या माध्यमातून का होईना सरकार, बँकेचे लक्ष वेधले जाईल. मात्र आतापर्यंत आंदोलनांचे दहा महिने होऊनही बँकेचा एकही अधिकारी फिरकला नसल्याचे आंदोलक शेतकऱ्यांनी सांगितले.
नाशिक जिल्हयातील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहेत. आता याच कर्जाच्या वसुलीसाठी बँक थेट थकबाकीदार शेतक-यांच्या जमीनीचे लिलाव करून लिलाव न घेतल्यास शेतक-यांची नावे ७/१२ खाते उता-यावरून नावे वगळून त्या जागेवर शेतक-यांच्या कब्जेदार सदरी विविध कार्यकारी सहकारी संस्थेची नावे व जिल्हा बँकेचे नाव लावण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा लढा सुरु असून अनेकदा आंदोलने झाली, बैठका पार पडल्या, मात्र अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेल्या 1 जून पासून म्हणजेच जवळपास आठ महिन्यापासून नाशिकच्या गोल्फ क्लब परिसरात हे आंदोलन सुरु आहे.
नाशिक जिल्हा बँकेच्या बेकायदेशीर जमिनी जप्तीच्या व लिलावाच्या कारवाईच्या विरोधात नाशिक येथे 01 जून 2023 पासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आज दिनांक 9 एप्रिल 2024 ला 10 महिने 13 दिवस पूर्ण झाले. मात्र सरकारने व जिल्हा बँकेने या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने आंदोलन स्थळावर नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुढी उभारण्यात आली. बँकेने याबाबत लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, असेही यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी कर्जमुक्ती आंदोलनाचे भगवान बोराडे, दिलीप पाटील, स्वामी इलेंजीलियन, डॉ. पाटील, युवराज केदारे आदी उपस्थित होते.
बँक-सरकार मिळून यावर निर्णय घ्या...
भगवान बोराडे म्हणाले कि, आज गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारली. आंदोलन सुरु झाल्यापासून आंदोलन स्थळी सगळे सण उत्सव साजरे केले जातात. लवकरच आमच्या आंदोलनाला वर्षही होईल. मात्र अद्यापही बँकेचे कुणीही अधिकारी आलेले नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, शेतकऱ्यांची भूमिका समजून घ्यावी, बँकेने सरकारने एकत्रित येऊन आमचा प्रश्न सोडवावा, तर दुसरीकडे' 'सरकारकडून दोन ओळीच लेटर आणा मग आम्ही शेतकऱ्यांना अडवणार नाही... असं बँक प्रशासनांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेठीस न धरता शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली.