Join us

Crop Management : डिंक्याचा प्रकाेप वाढताेय, कशी घ्याल संत्रा बागांची काळजी? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 9:57 AM

Orange Crop : अलीकडे संत्रा बागांवर शेंडेमर व डिंक्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने संत्रा उत्पादकांची चिंता वाढली आहे.

भूषण सुकेनागपूर : अलीकडे संत्रा बागांवर (Orange Farming) शेंडेमर व डिंक्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने संत्रा उत्पादकांची चिंता वाढली आहे. डिंक्या हा रोग बुरशीजन्य असून, झाडाला कुठल्याही अवस्थेत होतो, परंतु नवीन लागवडीमध्ये याचा प्रादुर्भाव अधिकच हानिकारक ठरतो. शेतकऱ्यांनी या राेगाचे वेळीच याेग्य व्यवस्थापन केल्यास आर्थिक नुकसान टाळता येईल, अशी माहिती डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डाॅ.प्रदीप दवणे यांनी दिली. प्रतिकूल हवामानामुळे शेंडेमर, डिंक्याचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संत्रा बागांना धाेका निर्माण झाला आहे. मागील २० वर्षांत काेळशीमुळे नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) काटाेल व नरखेड, तसेच लगतच्या अमरावती जिल्ह्यातील वरुड व माेर्शी तालुक्यांतून संत्रा बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

डिंक्या रोग हा रोग बुरशीमुळे होतो. या बुरशीमुळे साल व खोडामध्ये डिंक साठतो. डिंकाच्या दाबामुळे झाडाची साल उभी फाटते व डिंक ओघळू लागतो. दुर्लक्षित संत्र्याच्या बागांत ‘फायटोप्थोरा’ बुरशीमुळे हा रोग आढळून येतो. डिंक गळणाऱ्या झाडावर विपरित परिणाम होतो. कधी-कधी साल गळून पडते, पाने पिवळी पडतात व फांद्या सुकतात. रोगाची लागण फळांनाही होते. फळावर तेलकट नारिंगी डाग दिसून येतात व फळे गळून पडतात. झाडाच्या कुठल्याही अवस्थेत हा राेग होतो, परंतु नवीन लागवडीमध्ये डिंक्याचा प्रादुर्भाव अधिकच हानिकारक ठरतो. या रोगाचा प्रसार उष्ण तापमान २७ ते ३० डिग्री सेल्सिअस असताना बुरशी मोठ्या प्रमाणात वाढते. दुर्लक्षित संत्रा बागात बुरशीमुळे होणाऱ्या डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे संत्रा उत्पादकांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययाेजना करणे आवश्यक आहे, असेही डाॅ.प्रदीप दवणे यांनी सांगितले....असे करा व्यवस्थापनहा रोग मोसंबीवर प्रामुख्याने आढळून येतो. यासाठी रोग प्रतिकारक जातीचा जंबेरी खुंटावर जमिनीपासून १७ सेंटीमीटर अंतरावर डोळे भरावे. पाणी देताना झाडाच्या खोडाभोवती द्विआळे पद्धतीने पाणी द्यावे, त्यामुळे पाण्याचा बुंध्याशी संबंध येणार नाही. रोगट भागावरील साल खरवडून काढावी व त्यावर बोर्डो पेस्ट लावावी. (एक भाग मोरचूद, एक भाग चुना व आवश्यक तेवढे पाणी) यामुळे रोगकारक बुरशीचा नाश होईल. डायबॅक हा रोग प्रामुख्याने जंबेरीवर डोळे भरल्याने दिसून येतो. याकरिता पहिली बाब म्हणजे, जंबेरीवर डोळे न भरता इतर सुयोग्य खोडावर डोळे भरून कलमे तयार करावीत. महाराष्ट्राकरिता मार्मालेड, ॲलिमाे, रंगपूर संत्र्याचे खोड उपयोगात आणावे.

या औषधांची फवारणी कराट्रिस्टेझा आणि ग्रीनिंग हे रोग मावा व सायला यामुळे पसरतात, म्हणून त्यांचे व्यवस्थापन नवीन फूट दिसू लागताच, जानेवारी आणि जून महिन्यात प्रादुर्भाव दिसून येतो. या किडी कोवळ्या पानातून, कळ्यातून व बारीक नवीन फांद्यातून रस शाेषण करते. परिणामी, कळ्यांची वाढ न होता, त्या गळून पडतात, या किडीच्या व्यवस्थापनासाठी नागपुरी संत्र्याला नवती आल्यानंतर नीम तेल १०० मिली प्रति १० लीटर पाणी या प्रमाणात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. नीम तेल पाण्यात मिसळत नसल्यामुळे १० ग्रॅम डिटर्जंट पावडर प्रति १०० मिली नीम तेलात मिसळावे किंवा थायोमेथोक्झाम २५ डब्ल्यूजी १ ग्रॅम प्रति १० लीटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही १.५ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हा रोग मायकोप्लाझमालाइक ऑरगॅनिझम या सूक्ष्म जिवाणू आणि धातूक लसीपासून होतो. या व्यतिरिक्त झाड आणि खोड यांच्या खोडावरील सड दिसून येते. धातूक लसीमुळे होणारा ट्रिस्टेझा आणि मायकोप्लाझमालाइक ऑरगॅनिझम्समुळे ग्रीनिंग या रोगाचा फैलाव संत्रा, मोसंबीवर आढळून येणाऱ्या मावा आणि सायला या कीटकामार्फत होतो.- डाॅ.प्रदीप दवणे, कीटकशास्त्रज्ञ, कृषी महाविद्यालय, नागपूर.

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रपीकपीक व्यवस्थापन