- सुधीर चेके पाटील
बुलढाणा : बळीराजा (Farmer) म्हणजे सगळ्या जगाचा पोशिंदा. परिस्थिती कशीही असू देत, शेतकरी हिंमत न हारता आपलं काम सुरू ठेवतात अन् जगाचे पोट भरण्याचे काम करतात. चिखली (Chikhali) तालुक्यातील बेराळा येथील एका पायाने अधू असलेल्या जगन्नाथ सुरडकर या युवा शेतकऱ्याचे परिश्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल असेच आहे. हा शेतकरी कृत्रिम पायाचा आधार घेऊन शेतात डवरणीसह इतर कामे करून परिस्थितीसमोर हतबल न होता, जिद्दीने काम करीत असल्याचे दिसून येतो.
बेराळा येथील जगन्नाथ शिवसिंग सुरडकर (Jagannath Suradkar) यांचा सन २००६ मध्ये एका अपघातात पायाचा (accident) चुरा झाल्याने शस्त्रक्रिया करून तोडावा लागला. तेव्हापासून तो कृत्रिम पाय लावून जगतो आहे. याच पायाच्या आधारे तो शेतीतील सर्व अवघड कामे करतो. त्याच्याकडे केवळ दोन एकर शेती आहे. आई-वडील आणि त्याचा उदरनिर्वाह त्या शेतीवर चालत नसल्याने तो शेतमजूर ककम्हणून इतरांच्या शेतात वर्षभर राबराब राबतो. काम नाही किंवा हे काम आपल्याला जमणार नाही म्हणून बेरोजगारीचा शिक्का मिरवित गप्प बसणाऱ्या व कामापासून अंग काढून घेणाऱ्या अनेक धडधाडक तरुणांसाठी जगन्नाथची ही मेहनत निश्चितच प्रेरणादायी ठरावी, अशीच आहे.
पायावरून गेले होते वाहनाचे चाक
सन २००६ मध्ये जगन्नाथ लहान असताना शेतात गेला होता. तेव्हा एका वाहनाचे चाक त्याच्या पायावरून गेले. या अपघातात त्याचा पाय तोडावा लागला आहे. तेव्हापासून त्याला ‘जयपूर फुट’चा आधार आहे.
एका पायावर करतो शेतमजुरी
शेतशिवारात सध्या कोळपणीचे (डवरणी) काम सुरू आहे. हे काम बैल व मजुरांमार्फत केले जाते. यापृष्ठभूमीवर बेराळा येथील तरुणांनी एक चमू तयार करून रोजगार मिळविला आहे. एकाच जाळ्यावर सहा कोळपे लावले असून, त्या कोळप्यांवर सहाजण एकाचवेळी शेतात डवरणीचे काम करतात. याच सहाजणांत एका पाय नसलेला जगन्नाथ हादेखील मजुरीने काम करतो. एक पाय नसतानाही इतर तरुणांच्या बरोबरीने काम करतो.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
ज्ञानेश्वर खरात पाटील या युवकाने कृत्रिम पाय लावून शेतात राबणाऱ्या जगन्नाथचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यासोबत जगन्नाथचा आजवरचा प्रवास आणि आयुष्यात काम करून कंटाळला असाल किंवा कष्ट करण्यापासून लांब पळण्याचा विचार करीत असाल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी नक्की प्रेरणादायी ठरेल, असा संदेशही दिला आहे. या व्हिडीओत जगन्नाथ न डगमगता उत्साहात आपली कामे करीत असल्याचे दिसून येत आहे.