- प्रदीप बोडणे
गडचिरोली : अनेक घटक द्रव्य असलेल्या शिंगाड्याचे उत्पादन (Shingada Farming) गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli) आरमोरी तालुक्यातील वैरागड, अरसोडा येथे होते. काहार समाज बांधव शिंगाड्याचे उत्पादन घेतात. बाजारातही शिंगाड्याला चांगली मागणी आहे.
पूर्व विदर्भातील (Vidarbha) गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात ज्या ठिकाणी तलाव, बोड्यांची संख्या मोठी आहे, त्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी गावठाण जलसाठे आहेत व काहार समाज बांधव वास्तव्याला आहेत. त्या ठिकाणी शिंगाड्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील सीमावर्ती भागात काहार समाज बांधव वास्तव्याला आहेत. त्या-त्या भागात शिंगाड्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे वास्तव्याला असलेल्या काहार समाज बांधवांचा मुख्य व्यवसाय शिंगाड्याची शेती करणे हा आहे. पूर्वी केवळ तलाव, बोड्यांमध्ये शिंगाड्याचे उत्पादन घेत असत, आता ज्या ठिकाणी सिंचन व्यवस्था आहे, अशा शेताच्या बांधीतही शिंगाड्याचे उत्पादन घेतले जाते. बाजारात शिंगाड्याची वाढती मागणी व नफा लक्षात घेता, आता इतरही शेतकरी शिंगाड्याचे उत्पादन घेतात.
पावसाच्या सुरुवातीला जून महिन्यात शिंगाड्याच्या रोपांची लागवड केली जाते. नंतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापासून वेलांना फळे येणे सुरू होतात. शिंगाड्याचा हंगाम दोन महिने चालतो, नंतर पुन्हा जानेवारीत दुसऱ्या रोपांची लागवड काही शेतकरी करतात.
शिंगाड्याचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत. हाय ब्लडप्रेशर, लो ब्लडप्रेशर संतुलित राहतो. १०० ग्रॅम शिंगाड्याचे सेवन केल्यास १० ग्रॅम फायबर मिळते. पचनासाठीही शिंगाडे हलके आहेत. यात प्रोटीन मिळतात. मिळते. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. व्हिटॅमिन सीही शिगाड्याचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे. - डॉ. मधुकर पटले, फिजिशियन, वैरागड.
'शिंगाड्याचे नगदी पीक आहे. उत्पादन हाती आले की, लगेच चिल्लर विक्री केल्यानंतर पैसा मिळतो. मी एका बांदीत शिंगाड्याची लागवड केली आहे. २० ते २५ हजार रुपये उत्पादन खर्च असला, तरी दुपटीने शिंगाड्यात नफा मिळतो. एक ते दीड फूट एवढेच पाणी लागते.' - देवराव दुमाने, शेतकरी, वैरागड.