जळगाव :जळगाव जिल्ह्यात बियाण्यांचा तुडवडा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांना बळी पडू नये. तसेच विक्रेत्यांकडून गैरप्रकार वा बियाणे देण्यास टाळाटाळ होत असल्यास त्यासंदर्भातील तक्रारींचा २४ तासांत निपटारा करण्यासाठी जिल्हा परिषदेत तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. हा कक्ष शेतकऱ्यांना २४ तास सेवा देणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातून बियाणे, उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बियाणे उत्पादक कंपनीची बैठक घेतली. या बैठकीनुसार बियाण्यांचा तुटवडा जाणवणार नाही, अशी ग्वाही संबंधित कंपनीने दिली आहे. एखाद्या विक्रेत्याकडील साठा संपल्यास अन्य विक्रेत्यांनी दरवाढ केल्याचे आढळून आल्यास संबंधितांचा परवाना तातडीने निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
हेल्पलाइन कक्षाचे उद्घाटन
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात हेल्पलाइन कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या कक्षातील ७४९८९२२२१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधल्यास २४ तासांच्या आत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे. तसेच गैरमार्गान, जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्यांची तकार केल्यास त्यानुसार भरारी पथकाच्या माध्यमातून तत्काळ दखल घेतली जाणार आहे.
अशी घेणार दखल...
शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या 'हेल्पलाइन व नियंत्रण कक्षात २४ तास जिल्हा परिषदेचे कर्मचारी व अधिकारी सक्रिय राहणार आहेत, शेतकऱ्याने तक्रार केल्यास संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याला आणि भरारी पथकाला तातडीने माहिती दिली जाणार आहे. था दोन्ही यंत्रणा संबंधित तकारीची पडताळणी करून कारवाई करणार आहेत.
शेतकऱ्यांनो, येथे करा तक्रार
शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना, बिलाशिवाय ते खरेदी करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. बोगस बियाणे, खते अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे तक्रार करता येणार आहे. यासाठी कृषी विभागाकडून ०२५७-२२३९०५४ व मोबाइल क्र. ९८३४६८४६२० याठिकाणी तक्रार करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.