शेतकरी फुल गळ थांबविण्यासाठी फवारण्या मोठ्या प्रमाणात घेत आहे. यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. यावर पर्याय म्हणून कृषी विज्ञान केंद्र मालेगाव व आत्मा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मधमाशी पालन प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. यात मधमाशी पालन कसं करावं आणि त्याचा फायदा काय याची सविस्तर माहिती या प्रशिक्षणच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
मधमाशी पालन हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे. त्यामुळे हळूहळू शेतकरीमधमाशी पालनाकडे वळू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर कृषि विज्ञान केंद्र, मालेगाव व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मालेगाव तालुक्यातील मौजे वडेल व दाभाडी या गावात मधमाशी पालन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना मधमाशी पालन प्रशिक्षण देण्यात आलं आहे. यावेळी बहुतांश शेतकरी हे फळ उत्पादक असल्याने या मधमाशी पेटी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. मधमाशी पालनाद्वारे परागीभवन होते आणि या परागीभवनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनेक गोष्टीचा फायदा होत असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये कृषि विज्ञान केंद्र मालेगाव चे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ अमित पाटील यांनी प्रास्ताविक केले. रुपेश खेडकर यांनी मधमाशी पालनाचे महत्व सांगितले. त्यानंतर पिक संरक्षण तज्ञ विशाल चौधरी यांनी मधमाशी संवर्धनासाठी जैविक कीडनाशकांचा वापर करून उत्पादन खर्च कमी करावा, असे त्यांनी सांगितले. तसेच मधमाशांसाठी हानिकारक असणारे कीडनाशके फवारणी केल्यानंतर मधमाशीवर होणारे दुष्परिणाम यावर सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. प्रात्यक्षिकमध्ये मधमाशांची ओळख, मधपेटीची हाताळणी कशी करावी व मधमाशीच्या शत्रू पासून संरक्षण कसे करावे हे शेतकरी बांधवांना करून दाखविण्यात आले. तालुका कृषी अधिकारी भगवान गोरडे यांनी डाळिंब पिकामध्ये परागीभवनाचे महत्व सांगितले. शेवटी लाभार्थ्यांना मधुमक्षिका पेटीचे वाटप करण्यात आले. दरम्यान ज्या शेतकऱ्यांना मधमाशी पालन घ्यायचं आहे, त्यांनी मालेगाव कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मधमाशी पालन प्रशिक्षणात काय शिकवलं जातं?
मधमाशी पालनामुळे शेती उत्पादनाला होणारा फायदा
मधमाशीच्या विविध जाती आणि मधमाशीचे जीवनचक्र व कार्यप्रणाली
मधमाशी पालनासाठी आवश्यक असणारे साहित्य
मधमाश्या हाताळताना व स्थलांतर करताना घ्यावयाची काळजी
मधमाशी पालनाचे हंगामनिहाय व्यवस्थापन
मधमाशीपासून मिळणारे विविध पदार्थ
मधमाश्यांची ओळख : पाहणी, हाताळणी (मेल्लिफेरा, सातेरी, फुलोरी,
ट्रायगोना)