Join us

Rice Cultivation : नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात भात पेरणीला वेग, पेरणी नेमकी कशी केली जाते? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 8:05 PM

Rice Cultivation : राब भाजणीनंतर मान्सूनच्या (Monsoon) आगमनानंतर खरीप हंगामातील भात पेरणीची लगबग सुरु आहे. 

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात भातपेरणीला (rice Cultivation) सुरवात झाली आहे. काही भागात पावसाने चांगली हजेरी लावल्याने भात पेरणीला वेग आला असून आता पावसाने आभाळमाया करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सुरवातीच्या राब भाजणीनंतर मान्सूनच्या आगमनानंतर खरीप हंगामातील (Kharif season) भात पेरणीची लगबग सुरु आहे. 

खरीप हंगामाला खऱ्या अर्थाने मृग नक्षत्रापासून अर्थात ७ जूनपासून सुरुवात होते. मान्सूनचे आगमन काही दिवसांतच होईल. त्यामुळे ग्रामीण भागात पेरणीची लगबग सुरू झाली असल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik) त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, कळवण आदी भागात भाताची मोठी लागवड केली जाते. मात्र तत्पूर्वी पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी धूळ पेरणी करत असतात. याच पेरणीनंतर भात लागवडीसाठी रोपे तयार होत असतात. हीच पेरणीची कामे सध्या जोमात आहेत. 

ग्रामीण भागात नांगर, कुदळ, पाटे, चारफणी, सहा फणी अशा अवजारांच्या सहकार्याने पेरणी केली जाते. एकदा पेरणी झाली की, शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असतात. अन्यथा पावसाने दडी मारल्यास शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहते. मात्र पहिला पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी याच पावसाच्या भरवशावर भाताची पेरणी केली आहे. यात बहुतांश ठिकाणी इंद्रायणी, दफ्तरी, १००८, कोलम, आर २४ आदी भाताची लागवड करण्यात येत आहे.    

कशी केली जाते पेरणी 

काही दिवसांच्या आधी राब भाजणी केली जाते. पहिला पाऊस आल्यानंतर लागलीच भात पेरणी केली जाते. ज्यावर राब भाजणी केली जाते, याच ठिकाणी जमीन भुसभुशीत करून त्यावर हाताने फेकून, कुठे औताच्या साहाय्याने तर कुणी ट्रॅक्टरच्या साहाय्याने भात पेरणी केली जाते. यानंतर ग्रामीण भाषेतील दाताळ  या शेती अवजाराने बियाणे आणि माती एकरून केली जाते. किंवा औताच्या साहाय्याने करत असल्याने आळवटाच्या साहाय्याने एकरूप केली जाते. त्यामुळे फेकलेले बियाणे मातीशी एकरूप होऊन जमिनीत बुजले जाते. 

मशागतीच्या कामाला गती

सध्या शेतकरी शेतीच्या कामात गुंतले आहेत. बांधाची जुळवाजुळव करणे, शेतीतील सड, पालापाचोळा काढून रान स्वच्छ करणे, खत विस्कटणे आदी कामे शेतात सुरू असताना दिसत आहेत. आधुनिक पद्धतीने लोक शेती करत असले तरी ग्रामीण भागातील अजूनही परिस्थिती पारंपरिक पद्धतीने शेती करीत आहेत. दरवर्षी लागणाऱ्या नांगर, फाळ, औत, कासरे, दाताळे, खुरपे, रुम्हणे आदी पारंपरिक साहित्याची जुळवाजुळव करण्यात शेतकरी वर्ग गुंतला आहे. 

टॅग्स :शेतीनाशिकभातशेती क्षेत्र