Join us

Mohfule Ladu : असे बनवा मोह फुलापासून पौष्टिक लाडू, तोंडापूर कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 15:19 IST

Mohfule Ladu : सध्या ग्रामीण भागात मोहफुलापासून लाडू (Mohfule Ladu) बनविण्याचा लघु उद्योग चांगलाच प्रचलित आहे.

Mohfule Ladu :  मोहफुले प्रचंड उपयुक्त असून सध्या ग्रामीण भागात मोहफुलापासून लाडू (Mohfule Ladu) बनविण्याचा लघु उद्योग चांगलाच प्रचलित आहे. याच पार्श्वभूमीवर मोहाच्या फुलापासून आयुर्वेदिक औषधीयुक्त लाडू बनवण्याची प्रक्रिया आणि त्याचे प्रशिक्षण उमरदरा वाडी तालुका कळमनुरी येथे घेण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli District) कृषी विज्ञान तोंडापूर (Krushi Vidnyan Kendra) यांच्या माध्यमातून कळमनुरी या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणासाठी श्री महादजी शिरोडकर , सौ रोहिणी शिंदे यांनी पुढाकार घेतला त्यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. पी.पी. शेळके त्याचप्रमाणे विस्तार विभागाचे डॉ. अतुल मुरई हे सुद्धा उपस्थित होते.

मोहफुलांच्या लाडूचा उद्योग ज्या ठिकाणी मोह फुलांची उपलब्धता आहे आणि  गावांमध्ये इतर कुठलाही व्यवसाय उपलब्ध नाही अशा गावांमध्ये करता येण्यासारखा आहे. यावेळी गावातील अनेक महिलांनी लाडू बनवण्याच्या या प्रक्रियेत सहभाग नोंदविला. प्रत्यक्ष लाडू बनवून त्याचे पॅकिंग पर्यंतची संपूर्ण प्रक्रिया स्वतः करून बघितले. त्याचप्रमाणे कोणाला लाडू पाहिजे असल्यास त्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन केंद्राचे प्रमुख डॉ. पी.पी. शेळके करण्यात आले. 

अशी असते प्रक्रिया... मोहाची ताजी फुलं वेचायची. काडीकचरा बाजूला काढून, फुलं निवडायची. तीन चार दिवस कडक उन्हात छान वाळवून घ्यायची. ओलावा लागू न दिल्यास अशी वाळवलेली फुलं दोन वर्षही सहज टिकू शकतात. लाडू करायला घेताना ऊन असेल तर पुन्हा मोहाची फुलं उन्हात वाळवून घ्यायची. नंतर साजूक तुपात भाजून घ्यायची. थोडी कडक व्हायला हवीत. मग मिक्सरला लावून थोडीच बारीक करून घ्यायची. चुरा होऊ द्यायचा नाही. 

थोडे तीळ आणि सुके खोबरे भाजून, मिक्सरमध्ये थोडेसे फिरवून घ्यायचे. चवीनुसार आणि आरोग्याच्या गरजेनुसार ह्यात काजू, बदाम, हलीम, मेथीदाण्यांचा चुरा इत्यादी साहित्यही घेऊ शकता. ह्या मिश्रणात चवीनुसार किंचित मीठ टाकायचे. ह्या लाडूंना मोहाच्या फुलांचाच पुरेसा गोडवा असतो पण हवं असल्यास थोडं गुळही घालू शकता. या मिश्रणाचे छोटे छोटे लाडू वळून घायचे. गरज लागल्यास वळताना थोडे तूप घालायचे.

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतीहिंगोली