सध्या नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात उन्हाळ कांदा लागवड सुरु असून या कालावधी दरम्यान कांदा रोपांना पीळ पडण्याची समस्या जाणवू लागली आहे. कुठे रोपे वेडीवाकडी होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. अशावेळी कांदा पीळ रोगाचे व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा लागवडीनंतर या गोष्टीकडे प्रकर्षाने लक्ष देणे आवश्यक असते.
नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतेले जाते. सद्यस्थितीत उन्हाळ कांद्याची लागवड सुरु आहे. यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने खूप लागवड होत असल्याचे चित्र आहे. असे असताना कांदा लागवड केलेल्या रोपांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यात पिके पिके कोलमडण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार उपाययोजना केल्या जात आहेत. जेणेकरून पिके वेडी वाकडी होण्यापासून वाचविता येतील.
नेमकं रोप कशामुळे कोलमडतं?
जमिनीत वास्तव्य करीत असलेल्या बुरशीमुळे हा रोग होतो बियाण्याची उगवण होऊन कोंब जमिनीवर येण्याआधीच या बुरशीचा शिरकाव होऊन रोप मरते. काही वेळेला बी उगवून रोप वाढत असतांनाच जमिनीलगत खोडात या बुरशीचा शिरकाव होतो व रोप कोलमडून पडतात. रोपवाटीकेमध्ये रोपांची गर्दी असलेल्या ठिकाणी तसेच पाण्याचा निचरा होत नसलेल्या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. वेळीच योग्य उपाय न केल्यास थोडयाच दिवसात सर्व रोपे कोलमडून पडलेली आढळतात.
लागवड कशी करावी?
दरम्यान रब्बी हंगामातील कांद्याची लागवड ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात बी पेरून रोपाची लागवड डिसेंबर, जानेवारी महिन्यात सपाट वाफ्यात किंवा रूंद सरी वरंबा पध्दतीने करावी. जरी सरी वरंब्यावर कांद्याचा आकार मोठा होत असला तरी सपाट वाफ्यात रोपाचे प्रमाण जास्त राहत असल्यामुळे, मध्यम आकाराचे व एकसारखे कांदे मिळतात. रूंद सरी वरंबा पध्दतीमध्ये दोन सऱ्यातील अंतर समांतर ठेवून करावे. सपाट वाफा ३ ते ५ मिटर लांब आणि २-३ मिटर रूंद असावा. वाफ्यात पाणी देऊन त्यात रोपाची लागवड करावी. जमीनीची मशागत चांगली झाली असेल तर आणि वाफ्यातील माती चांगली मऊ आणि भूसभुशीत झाली असेल तर कोरड्यात रोपांची लागवड करून नंतर पाणी दिले तर रोपे चांगली जगतात.