Tomato Nursery : खरीप, रब्बी उन्हाळी या तीनही हंगामात टोमॅटो पिकाची (Tomato Crop) लागवड करता येते. त्यामुळे टोमॅटो हे महाराष्ट्रातील शेतक-यांचे प्रमुख फळपिक आहे. सध्या खरीप हंगामातील टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी रोपवाटिका तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे टोमॅटोची रोपवाटिका (Tomato Nursery) कशी तयार करावी? तयार करताना काय काळजी घ्यावी? हे या लेखातून पाहणार आहोत..
तर सुरवातीलाच टोमॅटो पिकाच्या रोपवाटिकेसाठी रान तयार करावे. रोपे गादीवाफ्यावर तयार करावेत. टोमॅटोचे रोप तयार करण्यासाठी बियांची पेरणी मे ते जून दरम्यान करावी. पेरणीआधी बीजप्रक्रिया करावी. रोपवाटिकेस सुरुवातीला झारीने पाणी द्यावे, नंतर पाटपाणी दिले तरी चालू शकते. टोमॅटोच्या बियांची रोपवाटिकामध्ये पेरणी केली जाते. यातूनच पुढे टोमॅटो लागवडीसाठी रोपे तयार होत असतात. यासाठी 3 x 0.6 मीटर आकाराचे आणि 10-15 सेमी उंचीचे उंच बेड तयार केले जातात. पाणी घालणे, तण काढणे इत्यादी कार्ये पार पाडण्यासाठी दोन बेडमध्ये सुमारे 70 सेमी अंतर ठेवले जाते. तर भारी जमिनीत पाणी साचण्याची समस्या टाळण्यासाठी उंच बेड आवश्यक आहेत.
सुरवातीला बीजप्रक्रिया करणे गरजेचे असते. यासाठी बीजप्रक्रिया करून हाताने दहा सेंटीमीटर अंतरावर रेषा ओढून त्यामध्ये एक सेंटिमीटर अंतर एक एक बी पेरावे. त्यानंतर गादी वाफे आच्छादनाने झाकून घ्यावेत. साधारणपणे पाच ते आठ दिवसात बी उगवते. बी उगवल्यानंतर आच्छादन काढून टाकावे. रोपे उगवल्यावर नायलॉनच्या जाळीने ती झाकून घ्यावीत. यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. रोपे चार ते सहा पानांवर आल्यावर म्हणजेच 25 ते 30 दिवसांनंतर काढून त्यांची पुनर्लागवड करावी. रोपे काढण्यापूर्वी त्यांना आदल्या दिवशी पाणी द्यावे.
रोपवाटिकेचा कालावधी (हंगाम )
खरीप : बी पेरणीचा कालावधी : मे ते जून सप्टेंबर, तर पुनर्लागवडीचा कालावधी : जून ते जुलै
रब्बी : बी पेरणीचा कालावधी : सप्टेंबर ते ऑक्टोबर, तर पुनर्लागवडीचा कालावधी : ऑक्टोबर ते नोव्हेंबर,
उन्हाळी : बी पेरणीचा कालावधी : जानेवारी ते फेब्रुवारी, तर पुनर्लागवडीचा कालावधी : फेब्रुवारी ते मार्च
संकलन : विभागीय संशोधन केंद्र आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र, इगतपुरी