Kharif Season : खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची (Kharif season) तयारी सुरु आहे. पाऊस आल्यानंतर पेरणी जाते. म्ह्णून खरीप हंगाम पूर्वतयारीसाठी माती परीक्षण, जमिनीची पूर्व मशागत, बियाण्यांची तरतूद, सेंद्रिय, रासायनिक, जिवाणू खतांची उपलब्धता करून ठेवणे, कीटकनाशकांची तरतूद आणि पेरणी अवजारे यांची दुरुस्ती कारवी लागते.. याबाबत सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ डॉ. कल्याण देवळाणकर यांनी शेतकऱ्यांना काय आवाहन केलंय, ते पाहुयात...
माती परीक्षण
जमिनीतील अन्नद्रव्यांचे नेमके प्रमाण जाणून घेण्यासाठी माती परीक्षण गरजेचे ठरते. माती परीक्षणानुसार पिकास द्यावयाची खते, खताची मात्रा निश्चित करता येते. त्यानंतर जमिनीची पूर्व मशागत करणे गरजेचे ठरते. यात शेतात ढेकळे असल्यास ती लोड किंवा मैदाच्या सहाय्याने फोडून घेणे. जमिन उंच सकल असल्यास तिफणीने सपाट करणे, आडव्या उभ्या कुळवाच्या पाळ्या देणे. शेवटच्या कुळवणी अगोदर शिफारशी प्रमाणे शेणखत, कंपोस्ट खत जमिनीत मिसळणे. जमिनीची बांध-बंधिस्ती करून पूर्वीच्या पिकाची धसकटे वेचणे.
महत्त्वाचं म्हणजे बियाणांची तरतूद
संकरित, अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित वाणांचा पीक वाढीसाठी महत्त्वाचा वाटा ठरतो. जास्त उत्पादन देणारे, खतास चांगला प्रतिसाद देणारे, कमी कालावधीत, कमी पाण्यात येणारे तसेच रोग किडीस प्रतिकारक्षम वाण निवडावेत. तसेच प्रमाणित बियाणे वापरावे, बियाणांची उत्पादन तारीख, शुद्धता, वाणाच्या जातीचे नाव, उगवण क्षमता इत्यादी गोष्टी पाहूनच बियाणे खरेदी करावे. बियाणांची पक्की पावती, लेबल जपून ठेवावेत, पुढील काळात तक्रारीसाठी ते काम येतात.
सेंद्रिय रासायनिक जिवाणू खतांची, कीटकनाशकांची उपलब्धता :
शिफारशी प्रमाणे लागणाऱ्या सेंद्रिय रासायनिक खतांची खरेदी करून ठेवणे. बाजरी भात, मका या तृणधान्य एकदल पिकांसाठी ऍझोटोबॅक्टर, शेंगवर्गीय द्विदल पिकांसाठी रायबोजियम गटनिहाय स्फुरद वीर, जिवाणू ट्रायकोडर्मा यांची खरेदी करून ठेवावी. त्याचबरोबर शेतीसाठी लागणाऱ्या अवजारे हत्यार यांची दुरुस्ती करून ठेवावी.