Join us

Trump Tariffs : 26 टक्के टेरिफचा भारतीय वस्त्रोद्याेगावर काय परिणाम होईल? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 13:26 IST

Trump Tariffs : अमेरिकेच्या निर्यात धोरणाचा सर्वाधिक फटका भारतीय वस्त्रोद्याेगाला (Cotton Industry) बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- सुनील चरपेनागपूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतातून अमेरिकेत निर्यात हाेणाऱ्या वस्तूंवर सरासरी २६ टक्के टेरिफ लावला आहे. याचा सर्वाधिक फटका भारतीय वस्त्रोद्याेगाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण अमेरिकेत भारतीय कापडाचे दर (Cotton Market) वाढण्याची आणि त्यातून मागणी कमी हाेऊन निर्यात (Export Down) मंदावण्याची शक्यता नाकारता येत आहे. याचा परिणाम देशातील राेजगार निर्मितीवर हाेऊ शकताे.

भारतात सर्वाधिक राेजगार जिनिंग, प्रेसिंग, स्पिनिंग, टेक्सटाइल व गारमेंट इंडस्ट्रीजची (Cotton Industry) साखळी देते. भारतातून अमेरिकेत दरवर्षी सरासरी ९.६ अब्ज डाॅलर्स किमतीच्या वस्त्र आणि पोशाखाची निर्यात केली जाते. अमेरिकेने डिस्काउंटेड रेसिप्रोकल टेरिफ लावला असला तरी भारतातून अमेरिकेत निर्यात हाेणारे वस्त्र व पाेशाख सुटण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण भारत अमेरिकन वस्तूंवर सरासरी ३९ टक्के तर अमेरिका भारतीय वस्तूंवर पाच टक्के टेरिफ लावत असल्याचा दावा डाेनाल्ड ट्रॅम यांनी केला आहे.

अमेरिकेत दर्जा व किमतीमुळे बांगलादेशच्या कापडाला भरीव मागणी आहे. मात्र, बांगलादेशातील अराजकतेमुळे ही संधी भारताकडे चालून आली हाेती. या टेरिफमुळे तीदेखील मावळल्यागत झाली आहे. टेरिफमुळे भारतीय कापड व पाेशाखाचे अमेरिकेत दर वाढल्यास मागणी कमी हाईल. त्यातून किमान १ ते २ अब्ज डाॅलर किमतीच्या कापडाची निर्यात कमी हाेऊन हा कापड देशांतर्गत बाजारात राहिल्यास कापड उद्याेगाला नुकसान हाेण्याची व त्यातून या उद्याेगावर राेजगार कपात करण्याची वेळ ओढवण्याची शक्यता जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे.

बांगलादेश व व्हिएतनामची स्पर्धा कमीअलीकडच्या काळात व्हिएतनामच्या वस्त्रोद्याेेगाने उचल घेतली आहे. त्यांच्या चलनाचे मूल्य डाॅलरच्या तुलनेत खूपच कमी असले तरी त्यांच्या वस्त्र व पाेशाख निर्यातीत भरीव वाढ झाली आहे. अमेरिकेने व्हिएतनामवर ४६ टक्के तर बांगलादेश ३७ टक्के टेरिफ लावला आहे.

या दोन्ही देशांच्या तुलनेत भारतावरील टेरिफ कमी वाटत असला तरी देशाच्या आर्थिक प्रगती व राेजगार निर्मितीचा वेग विचारात घेता हा टेरिफ अधिक आहे. या दाेन्ही देशांच्या वस्त्र व पाेशाख निर्यातीवर परिणाम हाेणार असून, केंद्र सरकारने भारताचे स्थान पक्के करण्यासाठी व्यवस्थित नियाेजन करून मार्ग काढणे गरजेचे आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रडोनाल्ड ट्रम्पशेतीकापूस