नाशिक : अनोखी चव, आकार, गंध, रंग, उत्पादकता या बाबतीत जगभरातील शेतकरी व ग्राहकांमध्ये मागणी असलेले वैशिष्ट्यपूर्ण पेटंट संत्रा वाण ‘टँगो’ (Orange variety Tango) भारतात आयात करण्यात आले आहे. राज्यातील लिंबू वर्गीय शेतीचा चेहरामोहराच यामुळे बदलणार आहे. ‘सह्याद्री फार्म्स’ या शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रयत्नांतून या वाणांची आयात करण्यात आली आहे. सध्या त्यावर क्वारंटाईन प्रक्रिया सुरु आहे. सह्याद्री फार्म्सने (Sahyadri Farms) या आधी द्राक्षांचे पेटंट वाण यशस्वीरित्या भारतात आणले आहेत. त्यानंतर ‘टँगो‘ हे संत्रा वाण आणले आहे. भारतीय फलोत्पादनातील ही महत्वपूर्ण घटना असेल. भारतीय लिंबूवर्गीय फळ उत्पादकांची उत्पादकता व आर्थिक उत्पन्न यात लक्षणीय वाढ होण्यास यामुळे मदत होणार आहे. जागतिक स्तरावरील अग्रगण्य वाण टँगो हे संत्रा वाण कॅलिफोर्निया विद्यापीठाने विकसित केलेल्या जागतिक स्तरावरील अग्रगण्य संत्रा वाणांपैकी एक आहे. युरोसेमिलास या अग्रगण्य कृषी नावीन्यपूर्ण कंपनीकडे या वाणाचे जागतिक परवाना अधिकार आहेत.
काय आहेत वाणाची वैशिष्ट्ये
टँगो संत्रा हे मध्यम आकाराचे आणि सोलण्यास सोपे फळ आहे. त्याची अनोखी चव, संतुलित आम्ल-साखर गुणोत्तर आणि पुरेपूर रसाळपणा यात आहे. टँगो जवळजवळ बियाविरहित आहे. हेच त्याचे खास वैशिष्ट्य सांगितले जाते. याच्या प्रति २५ फळांमध्ये फक्त ०.२ बिया आहेत. जवळच्या इतर कोणत्याही वनस्पतीतील विरोधी परागीकरणाची भीती या वाणात अजिबात नाही. वैशिष्ट्यपूर्ण आकार, रंग, चव, गोडीचे प्रमाण आणि सोलण्याच्या क्षमतेसह तुलनेने सहज साध्य होणारी उत्कृष्ट गुणवत्ता हे या वाणाचे विशेष आहे. हेक्टरी ६० टन इतकी उच्च उत्पादकता असून याची ही सर्व वैशिष्ट्ये पाहता या संत्र्याला बाजारात मजबूत विक्रीक्षमता राहील यात शंकाच नाही. जगभरातील ग्राहकांकडून या वाणाला मोठी मागणी आहे. फायदेशीर व शाश्वत शेतीसाठी…छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी शेती व्यवसाय हा फायदेशीर व शाश्वत स्वरुपाचा व्हावा, ही मुख्य भूमिका ‘सह्याद्री फार्म्स‘ या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालविलेल्या शेतकऱ्यांच्या कंपनीची आहे. या कंपनीच्या पुढाकारातून जगभरातील दर्जेदार पेटंट द्राक्ष वाण आपल्या सभासद शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिले आहेत. त्यातून सामान्य शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलले आहे. यातून जागतिक स्तरावर ‘सह्याद्री फार्म्स’च्या शेतकऱ्यांसाची गुणवत्तेच्या द्राक्ष उत्पादनावर आधारित विशेष ओळख निर्माण झाली आहे. नव्या पेटंट द्राक्ष वाणांच्या वाढीचे व वितरणाचे अधिकारही ‘सह्याद्री फार्म्स’ने प्राप्त केले आहेत. विविध वाणांच्या यशस्वी हाताळणीमुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. प्लॅन्ट क्वारंटाईन प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर हे वाण सह्याद्री फार्म्स संलग्न शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत सभासद शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिले जाणार आहे.या वाण आयातीमुळे प्रीमियम फळे आणि प्रक्रिया केलेल्या लिंबूवर्गीय उत्पादनांची देशात होणारी आयात कमी होण्यास मदत होणार आहे. राज्यात लिंबूवर्गीय फळपिकाखालील क्षेत्र सुमारे १ लाख ३५ हजारहून अधिक हेक्टर असून, सुमारे १ लाख ७० हजाराहून अधिक शेतकरी या पिकाचे उत्पादन घेत आहेत. संत्र्यांचे वार्षिक उत्पादन १८ लाख टन इतके आहे. या शेतकऱ्यांच्या हेक्टरी उत्पादकतेत आणि आर्थिक उत्पन्नात नव्या पेटंट वाणामुळे मोठा बदल होणार आहे. हा बदल या आधी द्राक्षपिकात यशस्वीरित्या घडला आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सह्याद्री फार्म्स’ आता द्राक्षाबरोबरच लिंबूवर्गीय फळपिकांसोबत नवा प्रवास सुरु करीत आहेत. टँगो संत्राच्या निमित्ताने लिंबू वर्गीय फळपिकांतील मुल्यसाखळी अजून मजबूत करणे,शेतकऱ्यांमधील उच्च उत्पादन क्षमता व उच्च उत्पन्न क्षमता वाढविणे, त्यासाठी जागतिक बाजारपेठेत मजबूत स्थान निर्माण करणे, त्याचा भरीव आर्थिक लाभ शेतकऱ्यांना मिळवून देणे हे आता आमच्या समोरील प्रमुख ध्येय असल्याचे ‘सह्याद्री फार्म्स‘चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी सांगितले. फलोत्पादनातील महत्वाचा टप्पामहाराष्ट्रातील फळपिकांमध्ये वाढीच्या प्रचंड क्षमता आहेत. प्रत्येक फळपिकाचा स्वतंत्र उद्योग होऊ शकतो. आपल्याकडील द्राक्षशेती हे याचे एक यशस्वी उदाहरण आहे. शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. नवे वाण शोधले. नवे तंत्रज्ञान आत्मसात केले आणि परिणामी महाराष्ट्रातील द्राक्षशेती एक उद्योग म्हणून आकारास आला. द्राक्षशेतीत आव्हाने अनंत आहेत. बऱ्याच ठिकाणी शेतकरी एकत्र येऊन त्यावर मात करताना दिसत आहे. महाराष्ट्रातील द्राक्षपिकात मागील ३ दशकांत जे सकारात्मक घडले आहे तेच आता संत्रा या राज्यातील महत्वाच्या पिकात घडण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांच्या समुहशक्तीच्या जोरावर ज्या प्रमाणे जगप्रसिद्ध स्पर्धाक्षम पेटंट वाण भारतात आयात झाले आणि ते आता इथल्या मातीत स्थिरावत आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या पुढाकारातून जगप्रसिध्द स्पर्धाक्षम संत्र्याचे वाणही परदेशातून भारतात दाखल झाले आहेत.
‘‘टँगो वाणामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर त्याचा ठळक प्रभाव पडणार आहे. लिंबूवर्गीय उत्पादनात आघाडीवर असलेले महाराष्ट्र राज्य हे याच पिकातील क्रांतीचा साक्षीदार होईल. भारतातील सध्याच्या संत्र्याच्या वाणाला जागतिक बाजारपेठेत मर्यादित वाव होता या नवीन वाणामुळे संधीची दारे खुली होतील असा विश्वास आहे.‘‘- विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सह्याद्री फार्म्स, मोहाडी, जि. नाशिक