चंद्रपूर : उन्हाळ्यात गरिबांचा फ्रिज म्हणून माठाकडे पाहिले जाते. मार्च महिन्यात चंद्रपूरचे तापमान ४० अंशांवर गेले आहे. तहान भागविण्यासाठी माठातील पाण्याला प्राधान्य दिले जाते. माठाला असलेल्या छिद्रातून पाणी झिरपते. उष्ण पाणी बाहेर पडते. यामुळे माठ थंड होतो. आणि माठाच्या आतील पाणीदेखील गार होते. ही प्रक्रिया सतत सुरू असते. यामुळे माठातील पाणी थंड होते आणि हे पाणी प्यायल्याने आरोग्य सुरळीत राहते, असे आयुर्वेदाचार्य डॉ. नम्रता बारापात्रे यांनी सांगितले आहे.
कोणत्या माठातले पाणी जास्त थंड?
लाल मातीचा माठ : लाल मातीच्या माठात पाणी सर्वाधिक लवकर थंड होते. यामधून पाणी झिरपण्याची प्रक्रिया वेगाने होते. यामुळे लवकर गार झालेले पाणी पिण्यासाठी उपलब्ध होते.
चिनी मातीचा माठ : चिनी मातीच्या माठाला बाहेरून आकर्षक डिझाईन केली जाते. परंतु, हा माठ पाहिजे त्या प्रमाणात पाणी थंड करू शकत नाही. यामुळे चिनी मातीच्या माठाला फारशी मागणी नसते.
काळ्या मातीचा माठ : काळ्या मातीच्या माठामध्ये नैसर्गिकरीत्या पाणी थंड होण्याचा प्रकार पाहायला मिळतो. सर्वांत मोठ्या प्रमाणात काळ्या मातीच्या माठात पाणी थंड होत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात काळ्या मातीचा माठ वापरतात.
कोणता माठ किती रुपयांना?
चिनी मातीचा माठ :
चिनी मातीचा माठ २५० ते ३०० रुपयांपर्यंत बाजारात विक्रीसाठी आहे. त्यावर नक्षीकाम असेल तर हा माठ आणखी जास्त दराने विकला जातो.
काळ्या मातीचा माठ :
१५० रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंत हा माठ बाजारात उपलब्ध आहे. या माठाला बाजारपेठेमध्ये सर्वाधिक मागणी आहे.
लाल मातीचा माठ :
लाल मातीच्या माठाची किंमत १५० ते ३०० रुपयांपर्यंत आहे. तर छोटी घागर ७० ते ९० रुपयाला विक्रीस आहे.
आयुर्वेदाचार्य काय म्हणतात...
माठातील नैसर्गिकरीत्या थंड झालेले पाणी आरोग्यासाठी सर्वोत्तम मातले जाते. माठातील पाणी पिल्याने शरीरातील कोरडेपणा आणि उष्णता संतुलित राहते. आयुर्वेदानुसार, पृथ्वी तत्त्वाच्या गुणधर्मामुळे शरीरातली उष्णता (पित्त) आणि हालचाल (वात) या गोष्टी नियंत्रणात राहतात. माठ पीएच (हायड्रोजनची संभाव्यता) संतुलित करून पाण्यातले आम्लयुक्त घटक कमी करतो. यामुळे अॅसिडिटी आणि जठरासंबंधीच्या समस्या दूर होतात. माठात साठवलेल्या पाण्यामध्ये खनिजे आणि पोषक तत्त्वं टिकून राहतात. त्यामुळे उष्माघात टाळता येतो. त्यामुळे उन्हाळ्यात माठाचा वापर करणे अधिक हितावह आहे.
-डॉ. नम्रता बारापात्रे, आयुर्वेदाचार्य चंद्रपूर