Join us

नाशिक जिल्ह्यात कादवा कारखान्याचा सर्वाधिक साखर उतारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 11:23 AM

नाशिक जिल्ह्यात या हंगामात रानवड, कादवा, नासाका हे तीन सहकारी तर रावळगाव आणि द्वारकाधीश या दोन खासगी कारखान्यांची चाके सुरू राहिली.

नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत कादवा, द्वारकाधीश है साखर कारफाने पूर्ण क्षमतेने सुरू असून रावळगाव, रानवड, नाशिक जिल्ह्यातील हे  कारखाने अपुऱ्या ऊसपुरवठ्यामुळे रडतखडत सुरू आहेत. जिल्ह्यात 4 जानेवारी 2024 अखेर 5 लाख 12 हजार 850  मे. टन उसाचे गाळप होऊन 4 लाख 45 हजार 556 क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. साखर उतारा 8.69 टक्के इतका उतरला आहे. 

राज्यात सुरू असलेल्या 197 कारखान्यांमधून 463.69 लाख मे.टन उसाचे गाळप होऊन 418.66 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे, तर साखर उतारा 9.04 टक्के इतका आहे. बिगरमोसमी पावसामुळे प्रति हेक्टरी उसाच्या उत्पादनात 8 ते 10 टक्के वाढ झाल्याने एकूण उपलब्ध उसामध्ये 5 टक्के वाढ झाल्याचे चित्र असून त्यामुळे राज्यात कारखान्याच्या गाळपाच्या दिवसांनीही शंभरी ओलांडली आहे.

नाशिक जिल्ह्यात या हंगामात रानवड, कादवा, नासाका हे तीन सहकारी तर रावळगाव आणि द्वारकाधीश या दोन खासगी कारखान्यांची चाके सुरू राहिली. त्यात सद्य:स्थितीत कादवा आणि द्वारकाधीशच हे दोन कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत, तर रावळगाव, रानवड, नाशिक हे कारखाने अपुऱ्या ऊसपुरवठ्याच्या समस्येशी झुंज देत कसेबसे चालविले जात आहेत. मोठ्या प्रमाणावर ऊसतोडणी मजुरांचीही कमतरता भासते आहे. 

कादवाचा गळीत हंगाम 

कादवा कारखान्याचा गळीत हंगाम 5 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू झाला. कादवाची दैनंदिन ऊस गाळप क्षमता 2500 मे. टन इतकी आहे. गेल्या दोन महिन्यांत कादवाने १ लाख 41 हजार 838 मे.टन उसाचे गाळप केले असून १ लाख 55 हजार 675 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे, तर साखर उतारा जिल्ह्यात सर्वाधिक 11 टक्के इतका आहे. कादवापाठोपाठ शेवरे, ता. सटाणा येथील द्वारकाधीश हा खासगी कारखाना सुरू असून त्याची दैनंदिन गाळप क्षमता 4000 मे. टन इतकी आहे. 3 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू झालेल्या या कारखान्याने आतापर्यंत 2 लाख 30 हजार 475 मे. टन उसाचे गाळप करत सर्वाधिक 1 लाख 73 हजार 930 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा 10 टक्के इतका आहे.

अपुरा ऊस पुरवठा 

रानवड कारखान्याने यंदा 49 हजार 742 मे. टन उसाचे गाळप करत 43 हजार 925 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. या कारखान्याचा साखर उतारा 9 टक्के आहे. नाशिक कारखान्याने 37 हजार 947 मे. टन उसाचे गाळप करत 31 हजार 826 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. साखर उतारा 9 टक्के राहिला आहे. रावळगाव कारखान्यानेही 52 हजार 850 मे. टन उसाचे गाळप करत 40 हजार 200 क्विंटल साखर उत्पादित केली असून साखर उतारा 7  टक्के राहिला आहे. या कारखान्यांना अपुऱ्या ऊसपुरवठ्याच्या समस्येने घेरले आहे.

 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :नाशिकसाखर कारखानेऊस