- राजाराम लोंढे
कोल्हापूर : पिकांचा वाढलेला उत्पादन खर्च पाहता, 'नाबार्ड' ने पीक कर्ज उचलीच्या (crop Loan) मर्यादेत वाढ केली आहे. शेतकऱ्यांना सर्वाधिक पीक कर्ज हेक्टरी १ लाख ७० हजार रुपये आडसाल ऊस (sugarcane) पिकासाठी मिळणार आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यात हेक्टरी ३० हजारांनी वाढ झाली असून, भाताला ५० हजार रुपये तर सोयाबीनला (Soybean) ६६ हजार रुपये मिळणार आहेत. राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या शिफारसीनंतर जिल्हा बँक २०२४-२५ या हंगामासाठी देण्यात येणाऱ्या खरीप पिकासाठी (kharif Crop) त्याची अंमलबजावणी करणार आहे.
रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ झाली असून, मजूर व मशागतही महागली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चातही वाढ झाल्याने त्या तुलनेत पीक कर्ज मिळावे, यासाठी शेतकऱ्यांचा आग्रह असतो. जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने कर्ज वाढीची केलेली शिफारस राज्यस्तरीय तांत्रिक समिती तपासते. त्यानंतर 'नाबार्ड'च्या मान्यतेने वाढीव दराच्या सूचना वित्तीय संस्थांना दिल्या जातात. यंदा जिल्हा बँकेने पीक कर्जाच्या दरात वाढ केली आहे. आडसाल ऊस लागणीसाठी हेक्टरी १ लाख ७० हजार रुपये, पूर्व हंगामीसाठी १ लाख ४० हजार रुपये, सुरु लागणीसाठी १ लाख ३५ हजार रुपये तर खोडवा उसासाठी १ लाख १५ हजार रुपये पीक कर्ज मिळणार आहे.
खावटी, आकस्मिक कर्जातही वाढ
शेतकऱ्यांच्या इतर गरजा भागवण्यासाठी पीक कर्जाशिवाय खावटी व आस्कमिक कर्जाची गरज भासते. मंजूर पीक कर्जाच्या ३० टक्के खावटी तर २० टक्के आकस्मिक कर्ज मिळते. बँकेच्या व्याज दराच्या तुलनेत शेतकऱ्यांकडून व्याजाची आकारणी केली जाते. साधारणतः प्रत्येक विकास संस्थेत पीक कर्जासोबतच खावटी व आस्कमिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ६० टक्के असते.
असे मिळणार पीक कर्ज उचल
नाबार्डने पीक कर्ज उचलीच्या मर्यादित वाढ केले आहे. त्यानुसार कोणत्या पिकाला किती उचल असणार आहे, ते पाहूया... यानुसार आडसाली ऊसास 01 लाख 70 हजार रुपये, पूर्व हंगामी ऊस 01 लाख 40 हजार रुपये, सुरू ऊस लागण 01 लाख 35 हजार रुपये, ऊस खोडवा 01 लाख 15 हजार रुपये, भात 50 हजार रुपये, सोयाबीन 66 हजार रुपये, नागली 36 हजार 800 रुपये, फळबागा 55 हजार रुपये, पालेभाज्या 30 हजार रुपये अशी उचल असणार आहे.