सातारा : जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने विविध पिके आणि फळबागांसाठी (Fruit Farming) कर्जदर निश्चित केले आहेत. यामध्ये यावर्षीही अनेक पिके आणि फळबागांच्या कर्जदरात वाढ करण्यात आली आहे. बाजरीला हेक्टरी २७ हजार ५००, तर उसाला दीड लाख आणि डाळिंब बागेसाठी १ लाख ३७ हजार ५०० रुपये पीक कर्ज उपलब्ध होणार आहे.
सातारा (Satara) जिल्ह्यातील खरीप हंगाम मोठा असतो. तसेच रब्बी हंगामातही विविध पिके घेण्यात येतात. त्याचबरोबर फळबागा, ऊस आदी पिकेही असतात. यासाठी बँकांच्यामार्फत पीक कर्जपुरवठा करण्यात येतो. यामध्ये जिल्हा बँक सर्वाधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज देते. यावर्षी पीक कर्जदरात वाढ करण्यात आलेली आहे. जिल्हा तांत्रिक समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध बँकांमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येते. यामध्ये जिरायत आणि बागायत पिकासाठी (Fruit farming) वेगवेगळी कर्ज उचल आहे.
कांद्याला ५५ हजार रुपये...
२०२४-२५ वर्षासाठी पीक कर्जाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये उसासाठी सर्वाधिक कर्ज मिळणार आहे. आडसाली उसाला हेक्टरी दीड लाख तर पूर्व हंगामी, सुरू उसाला १ लाख ३० हजार तसेच खोडवा उसाला एक लाख रुपये हेक्टरी कर्ज उपलब्ध होणारं आहे. तसेच कांद्याला हेक्टरी ५५ हजार रुपये पीक कर्ज मिळणार आहे. टोमॅटोला ७२ हजार ५००, बागायत मिरचीला २२ हजार ५०० आणि जिरायतला १२ हजार ५०० रुपये कर्जपुरवठा होणार आहे.
ऊस, कांदा, द्राक्षे पीक कर्जात वाढ...
यावर्षी ऊस, कांदा, डाळिंब, द्राक्षे, हळद, भात, बाजरी आदी पिकांच्या कर्ज मर्यादित वाढ करण्यात आलेली आहे. उसात हेक्टरी पाच हजारांची कर्ज वाढ करण्यात आली आहे. कांदा पिकात चार हजार, डाळिंब दीड हजार, खरीप भात तीन हजार, खरिपातील बागायत बाजरीलाही तीन हजार रुपये पीक कर्ज जादा मिळणार आहे.
भात ५० हजार, ज्वारी ३२ हजार रुपये
खरीप हंगामात भाताचे पीक घेण्यात येते. यासाठी हेक्टरी ५० हजार रुपये पीक कर्ज देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. तर बागायत क्षेत्रातील बाजरीसाठी २५ हजार आणि जिरायतमधील बाजरीकरिता २२ हजार ५०० रुपये कर्ज उपलब्ध होणार आहे. खरिपातील संकरित पिकात भाताला ५५ हजार तर बाजरीला २७ हजार ५०० रुपये पीक कर्ज मिळणार आहे. मकेला ३७ हजार ५०० रुपयांची शिफारस आहे. रब्बी हंगामातील ज्वारीसाठी हेक्टरी ३२ हजार ५०० रुपये पीक कर्ज मिळणार आहे.
स्ट्रॉबेरीला ५ लाख ४६ हजार...
स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनाही पीक कर्ज पुरवठा करण्यात येतो. आता या शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी (सर्वसाधारण) साठी हेक्टरी ४ लाख २९ हजार तर व्हर्टिकल स्ट्रॉबेरीसाठी ५ लाख ४६ हजार रुपये हेक्टरी कर्जपुरवठा होणार आहे. दाक्षांसाठी (सर्वसाधारण) २ लाख २५ हजार तर निर्यातक्षम द्राक्षांसाठी ३ लाख २० हजार रुपये हेक्टरी पीक कर्जदर निश्चित करण्यात आलेला आहे.