Join us

Indrayani Rice : इंद्रायणी भाताची गोष्ट! कुठं आणि कसं तयार झालं हे सुगंधित वाण? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 8:09 PM

इंद्रायणी भाताच्या या वाणाचा शोध कुठं आणि कसा लागला? हेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत... 

Nashik : आजही महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाच्या आहारात भात हा पदार्थ हमखास पाहायला मिळतो. त्यातही इंद्रायणी तांदळाला अधिक पसंती असते. नाशिकच्या (Nashik) इगतपूरी, त्र्यंबकेश्वर आदी आदिवासी पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर या इंद्रायणी भाताचे (Indrayani Rice) उत्पादन घेतले जाते. नेमकं भाताच्या या वाणाचा शोध कुठं आणि कसा लागला? हेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत... 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी Igatpuri) येथे हे संशोधन केंद्र 1941 पासून कार्यरत आहे. या संशोधन केंद्राचे हे संशोधन केंद्र उपपर्वतीय विभागामध्ये येत असल्याने या ठिकाणी प्रामुख्याने भात, नागली, वरई, खुरसणी आदी पिके घेतली जातात. आणि याच पिकांवर प्रामुख्याने संशोधन केले जाते. या संशोधन केंद्राला संलग्न असलेल्या पुण्यातील (Pune) वडगाव मावळ येथील कृषी संशोधन केंद्र हे देखील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येते. आणि याच संशोधन केंद्रात 1987 साली इंद्रायणी हे वाण विकसित करण्यात आलं.

नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास 60 ते 70 टक्के क्षेत्र इंद्रायणी भाताच्या वाणाखाली येते. इंद्रायणी वाणाचा प्रवास पाहिला तर सुरवातीच्या काळात त्याचा प्रसार कमी झाला. परंतु हळूहळू इंद्रायणी तांदळाविषयी ग्राहकांची पसंती वाढत गेली. परिणामी आज हे वाण अतिशय उच्च शिखरावर आहे. सुरवातीला प्रसारासाठी अडचणी आल्या, मात्र वाणाची सुवासिकता, चव या वैशिष्ट्यांमुळे अल्पवधीतच हे वाण प्रसिद्ध झाले. शिवाय आजघडीला इंद्रायणी भाताला सर्वाधिक दर मिळतो आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून फुले कॉलम आणि सुपर पवना हे नवीन भाताचे वाण विकसित केलेले असून येत्या दोन वर्षात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर दिसतील. 

थोडक्यात इतिहास पाहुयात.... 

तर इंद्रायणी वाणाच्या संशोधनाचा इतिहास असा की वडगाव भात संशोधन केंद्र हे पुण्याच्या मावळ प्रांतात स्थित आहे. या संशोधन केंद्रावर सुरवातीच्या काळात डॉ. शंकरराव कळके यांनीच खऱ्या अर्थाने इंद्रायणी भाताची मुहूर्तमेढ रोवली. डॉ. कळके यांच्या टीमने जवळपास 16 वर्ष यावर संशोधन करून आपल्याला इंद्रायणी तांदळाची चव मिळवून दिली. साधारण 1987 साली येथीलच आय.आर.८' आणि आंबेमोहोर या दोन जुन्या भात वाणांचा संकर करण्यात आला. त्यातून नवे सुंगधित इंद्रायणी वाण तयार झाले. पुण्यातुन वाहत जाणाऱ्या इंद्रायणी नदीवरून या वाणाला इंद्रायणी नाव दिल्याचे सांगण्यात येते. 

साभार : डॉ. दीपक डामसे, खुरासणी पैदासकार, इगतपुरी विभागीय संशोधन केंद्र.

टॅग्स :शेतीइगतपुरीपुणेइंद्रायणीशेती क्षेत्र