Join us

भुईमुगावर रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव झालाय? असं करा एकात्मिक किड व्यवस्थापन 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 1:30 PM

नुकसान टाळण्यासाठी भुईमूग पिकावरील कीडींचे वेळीच एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे ठरते.

भुईमूग पिकाचा हंगामानुसार विचार केला तर तीनही हंगामामध्ये हे पीक घेतले जाते. पिकावर  वेगवेगळ्या किडींच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी या पिकाचे मोठे नुकसान होते. नुकसान टाळण्यासाठी भुईमूग पिकावरील कीडींचे वेळीच एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे ठरते. जेणेकरून पिकांचे उत्पादन चांगले येण्यास मदत होईल. सद्यस्थितीत भुईमुंगावर पानांमधून रस शोषणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होत आहे. यावर काय उपाययोजना करावी याबाबत मालेगाव कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) विशाल गणेश चौधरी यांनी माहिती दिली आहे. 

भुईमुगावरील महत्वाच्या किडी जर बघितल्या तर त्यामध्ये जमिनीत मातीमध्ये असणाऱ्या किडी - वाळवी, हुमणी अळी, मुळे खाणारी अळी, रस शोषक किडी - फुलकिडे, तुडतुडे, मावा,  पतंगवर्गीय किडी -  पाने पोखरणारी अळी (नागअळी), लाल केसाळ अळी, बिहारी केसाळ अळी व तंबाखूवरील पाने खाणारी अळी.

रस शोषक किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी.... 

भुईमूग पिकांमध्ये प्रत्येक १० ओळीनंतर एक ओळ चवळी या सापळा पिकाची लागवड करावी. यामुळे रस शोषक कीड विशेषतः मावा आकर्षित होते. यावर मित्रकीटकांचे संवर्धन होऊन संख्येत वाढ होते. भुईमूग पिकामध्ये मका आंतरपीक घेतल्यास फुलकिड्यांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत मिळते. रस शोषक किडींच्या प्रभावी व्यवस्थापनाकरिता २० ते २५ पिवळे निळे चिकट सापळे लावावेत.

फुलकिडे ओळख व नुकसानीची पद्धत - अतिशय लहान फुलकिडे पानाच्या कोवळ्या शेंड्यामध्ये व पानांवर दिसून येतात. लहान पिल्ले व प्रौढ पानावर खरडून त्यातून निघालेल्या अन्नरसाचे शोषण करतात. पानावर पांढरे-पिवळसर फिक्कट चट्टे पडतात. पानाच्या खालचा भाग तपकिरी रंगाचा होतो. सूर्यप्रकाशात पाहिल्यास तो चमकतो. 

तुडतुडेओळख व नुकसानीची पद्धत - हिरवे, पाचरीच्या आकाराचे, चाल तिरकस. पिल्ले व प्रौढ पानाच्या खालच्या बाजूने राहून पानातील रस शोषतात. पाने पिवळी पडतात. प्रादुर्भावग्रस्त पानाच्या शेंड्यावर “V” आकाराचे चट्टे दिसून येतात. अशा करपलेल्या पानांवरील लक्षणांना ‘हॉपर बर्न’ म्हणतात. या किडीचा प्रादुर्भाव खरीप हंगामात ऑगष्ट- सप्टेंबर महिन्यात आणि उन्हाळी हंगामात फेब्रुवारी- मार्च महिन्यात अधिक आढळतो.

मावा ओळख व नुकसानीची पद्धत - लहान आणि अंडाकृती, काळपट, लालसर, तपकिरी किंवा पिवळसर रंग. पिल्ले व प्रौढ सतत पानातील रस शोषतात. शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या गोड मधासारख्या चिकट द्रवावर काळ्या बुरशींची वाढ होते. कालांतराने पाने चिकट व काळी पडतात. प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया मंदावते. झाडाची वाढ खुंटते. या किडीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास झाडांची पाने सुरवातीला पिवळी  होऊन गळून पडतात. कालांतराने संपूर्ण झाड वाळते. 

एकात्मिक कीड व्यवस्थापन कसं करावे?

पिकांची फेरपालट करावी. शक्यतो सोयाबीन पीक घेतल्यानंतर भुईमूग पीक घेऊ नये.इमिडाक्लोप्रिड (१८.५०%) अधिक हेक्झाकोनॅझोल (१.५०% एफएस) (संयुक्त कीटकनाशक व बुरशीनाशक) २ मि.लि. त्यानंतर ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम, रायझोबिअम २५ ग्रॅम अधिक स्फुरद विरघळवणारे जिवाणू (पीएसबी) २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या अनुक्रमाने बीजप्रक्रिया करून पेरणी करावी.चवळी, सोयाबीन, एरंडी या सारखी सापळा पिके भुईमूग पिकाच्या चारही बाजूंनी लावावीत. यामुळे मुख्य पिकावर मावा व तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो.   पीक लागवडीनंतर ४० दिवसांपर्यंत शेत तणविरहित ठेवावे. शेतात व धुऱ्यावर बावची वनस्पती असल्यास ती उपटून नष्ट करावी यामुळे स्पोडोप्टेरा अळीचा प्रादुर्भाव  रोखण्यास मदत होते.  कीड व रोग प्रादुर्भावग्रस्त पाने, अंडीपुंज असलेली पाने, जाळीदार पाने गोळा करून अळीसह नष्ट करावीत.  हेक्टरी पाच प्रकाश सापळे, ३० ते ४० पक्षी थांबे लावावेत. तंबाखूचे पाने खाणाऱ्या अळीच्या सर्वेक्षणाकरिता हेक्टरी ५ आणि कीड व्यवस्थापनाकरिता प्रति हेक्टरी १० कामगंध सापळे लावावेत. त्यातील ल्युर, प्रलोभने शिफारशीत वेळेत बदलावेत. लष्करी अळीच्या (स्पोडोप्टेरा लिट्यूरा) एस.एल.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशक ५०० मि.लि. प्रति हेक्टर या प्रमाणात फवारणी करावी.  अळी वर्गीय किडींचा प्राथमिक स्वरूपाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास निंबोळी अर्क (५%) किंवा कडूनिंब आधारीत कीटकनाशक ॲझाडिरॅक्टिन (३०० पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे  वापर करावा. 

शेवटचा पर्याय म्हणून..... 

व्यवस्थापनाचे सर्व उपाय वापरल्यानंतरही किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक झाल्यास शेवटचा पर्याय म्हणून विविध किडींच्या व्यवस्थापनासाठी शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या घाव्यात.मावा, मुळे खाणारी अळीसाठी क्लोरपायरिफॉस (२०% ईसी) २० मि.लि./१० लिटर पाणी वाळवीसाठी थायामेथोक्झाम (७५% एसजी), २.५ ग्रॅम/१०लिटर पाणीमावा, तुडतुडेसाठी इमिडाक्लोप्रिड (१७.८% एसएल)    २.५ मि.लि./१० लिटर पाणीतुडतुडे, फुलकिडे, लीफ मायनर नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५% ईसी), ५ मि.लि. व क्विनॉलफॉस (२५% ईसी), २० मि.लि.प्रती १० लिटर पाणी तुडतुडे, लष्करी अळी, स्पोडोप्टेरा लिट्यूरा    नियंत्रणासाठी थायामेथोक्झाम (१२.६%) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (९.५% झेडसी) ३ मि.लि./१० लिटर पाणी या प्रकारे प्रमाण घेऊन फवारण्या कराव्या. लेखक विशाल गणेश चौधरी विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण)कृषी विज्ञान केंद्र मालेगाव (नाशिक)

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीनाशिकपीक व्यवस्थापन