नाशिक : कांद्यावर तणनाशक फवारल्यानंतर (Herbicide) संपूर्ण कांद्याचे पीक जळून गेल्यामुळे येथील १७ शेतकऱ्यांनी सुमारे १५ हेक्टरवर केलेली कांद्याची लागवड (Kanda Crop Damage) पूर्णपणे जळून गेली असून कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांचे अडीच कोटी रुपयांपेक्षाही जास्त आर्थिक नुकसान झाले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मुखेड येथील १० शेतकऱ्यांनी स्थानिक नवजीवन कृषी सेवा केंद्रातून कांद्यावर तणनाशकाच्या फवारणीसाठी म्हणून मागणी केली असता, दुकानदार समीर इनामदार यांनी अनु, प्रॉडक्ट लिमिटेड दिल्ली या कंपनीचे एफ ए पी २४ ४१८ या लॉटमधील तणनाशक शेतकऱ्यांना पुरविले. हे तणनाशक फवारल्यानंतर पंधरा दिवसांनी संपूर्ण कांद्याचे पीक जळून गेल्याचे दिसून आले.
या प्रकाराने शेतकरी वर्ग हादरून गेला आहे. त्यांनी त्वरित स्थानिक दुकानदार तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून या कंपनीवर योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली. तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्लॉटची प्रत्यक्ष पाहणीही केली. यावेळी घटनाक्रम सांगताना संपूर्ण सहा एकर क्षेत्रातील कांदा पीक जळून गेल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी विकास आहेर यांना अश्रू अनावर झाले.
कृषी खात्याने कंपनीच्या कारभाराची दखल घेतली असून एफ ए पी २४ ४१८ बॅचचा सॅम्पल काढून त्याची तालुक्यात होणारी विक्री बंद केली आहे. तणनाशक फवारल्यामुळे झालेले कांद्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.- शुभम बेरड, तालुका कृषी अधिकारी येवला.