Nashik Onion Farming : देशातील कांद्याचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील खरीप कांद्याची लागवड (Onion Cultivation) 47 हजार 83.70 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. यात सर्वाधिक कांदा लागवड चांदवड तालुक्यात झाली असून दुसऱ्या स्थानावर येवला तालुका आहे. कांदा लागवडीची ही आकडेवारी 20 सप्टेंबरपर्यंतची असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यात (Nashik Onion Farming) दरवर्षीं मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले जाते. साधारणपणे, हंगामातील कांद्याची लागवड जुलै-सप्टेंबरमध्ये होते आणि त्याची काढणी ऑक्टोबरच्या उत्तरार्धात सुरू होते आणि डिसेंबरपर्यंत चालू राहते. उशिरा खरीप कांद्याची लागवड (Kanda Lagwad) ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होते आणि कापणी जानेवारीमध्ये सुरू होते आणि मार्चच्या मध्यापर्यंत चालू राहते. गेल्या हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे लागवडीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. आता काही भागात लागवडीला वेग आला असल्याचे चित्र आहे.
चांदवड तालुक्यात सर्वाधिक लागवड
सद्यस्थितीत 20 सप्टेंबरपर्यंतची कांदा लागवडीची आकडेवारी पाहिली असता नाशिक जिल्हा कृषी विभागाच्या माहितीनुसार 20 सप्टेंबर पर्यंत नाशिक जिल्ह्यात 47 हजार 83.70 हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. यात निफाड तालुक्यात 208 हेक्टर, सिन्नर तालुक्यात 1979 हेक्टर, येवला तालुक्यात 10 हजार 816 हेक्टर मालेगाव तालुक्यात 7 हजार 273 हेक्टर, सटाणा तालुक्यात 03 हजार 520 हेक्टर, नांदगाव तालुक्यात 5 हजार 607 हेक्टरवर झाली आहे.
या तालुक्यात शून्य लागवड....
तर कळवण तालुक्यात 89 हेक्टर, दिंडोरी तालुक्यातील 2846 हेक्टर आणि सर्वाधिक कांदा लागवड ही चांदवड तालुक्यात जवळपास 14 हजार 712 हेक्टरवर झाली आहे. तर सुरगाणा, त्र्यंबक, पेठ, इगतपुरी, नाशिक तालुक्यात कांदा लागवड झाल्याची नोंद 20 सप्टेंबर पर्यंत झालेली नसल्याचं या अहवालावरून दिसून येते. सध्या शेतकरी कांदा लागवडीत व्यस्त असून यंदा जिल्ह्यात किती कांदा लागवड होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.