नाशिक : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दरात घसरण (Kanda Market Down) सुरूच असून लिलाव सुरू झाल्यानंतर छावा संघटना व शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. गेल्या पंधरवाड्यात ४ हजारांच्या पुढे असलेले बाजारभाव आज निम्म्याच्या आत आल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यानंतर येवला-मनमाड मार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केले.
देशांतर्गत लाल कांद्याची आवक (Kanda Aavak) वाढल्याने लासलगावसह जिल्हाभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कांद्याला अवघा सरासरी १ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या संघटनेच्या छावा कार्यकर्त्यांनी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी येवला बाजार समितीतील लिलाव बंद पाडत येवला-मनमाड रस्त्यावर तासभर रास्ता रोको आंदोलन केले.
या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या
कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द करा, शेतकऱ्यांना २५ रुपये किलोप्रमाणे अनुदान द्या. कांद्याला ५ हजार रुपये प्रतिक्चिटल हमीभाव द्या, शेती पंपासाठी दिवसा कायमस्वरूपी वीजपुरवठा करावा, कापसाला किमान १५ हजार रुपये भाव द्या, सोयाबीनला १० हजार रुपये प्रतिक्चिंटल भाव द्या, स्वामीनाथन आयोग लागू करा, तसेच नाफेड व एन.सी., सी.एफ. ने प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी आंदोलक शेतकयांनी निवेदनाद्वारे केली.
उमराणे, लासलगावात दरप्रश्नी आंदोलन
लाल कांद्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू असल्यामुळे कांदा लागवडीवर झालेला खर्चही वसूल होतो की नाही अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे कांद्यावरील निर्यात शुल्क हटवावे, यासाठी उमराणे बाजार समितीत शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लासलगाव बाजार समितीतही शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत केंद्र शासनाचा निषेध नोंदवला होता.