धुळे : कांद्याला समाधानकारक दर (Kanda Market) मिळत असताना कांदाचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नाशिकसह कांदा पट्ट्यात या चोरीच्या घटना घडत आहेत. आता धुळे जिल्ह्यातही अशीच घटना घडली आहे. साक्री तालुक्यातील सामोडे येथील चोरट्यांनी गुदाम फोडून दोन लाख रुपये किमतीचा ४९ क्विंटल कांदा लंपास केल्याची घटना घडली.
साक्री येथील रहिवासी तथा नवापूर येथील प्राथमिक शिक्षक हर्षवर्धन सोनवणे यांच्या पत्नी स्मिता सोनवणे यांना कांदा खरेदी-विक्रीचा (Onion Market) व्यवसाय आहे. कांदा हा सामोडे शिवारातील आशापुरी काट्याजवळ आदित्य ट्रेडिंग नावाच्या गोडाऊनमध्ये ठेवला होता. २९ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास देखरेखीचे काम करणारे अनिल वानखेडे हे जेवणासाठी घरी गेला.
त्यानंतर रात्रीतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १४० गोण्यांमध्ये भरून ठेवलेला १ लाख ९६ हजार रुपये किमतीचा सुमारे ४९ क्विंटल कांदा चोरून नेला. यासाठी चोरट्यांनी वाहनाचा वापर केला असून गोडाऊनवर आले असता कांदा चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन सणासुदीच्या वेळी कांदा व्यापाऱ्याला आर्थिक फटका बसला आहे.
पीक चोरीच्या घटना वाढल्या
साक्री तालुक्यात शेतातून कांदा चोरीच्या घटना वाढल्या आहेत. याआधीही तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात कांदा, सोयबीन, तांदूळ अशा पिकांची चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्या घटनांपैकी एकाही घटनेचा तपास अद्याप लागलेला नाही. त्यात आता पुन्हा कांदा चोरीची घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरीच्या घटनांचा तपास त्वरित लावावा, अशी मागणी करण्यात येत आहे.