- सुनील चरपे
नागपूर : चालू हंगामात देशभरात कापसाचे उत्पादन (Cotton Production) घटले आहे. खर्च वाढला असून, उत्पादकता घटल्याने तसेच कापसाला एमएसपीच्या आसपास दर मिळत असल्याने शेतकरी कापसाला पर्यायी पीक शाेधत आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात (Kharif Season) देशात कापसाचे पेरणी क्षेत्र किमान १८ ते २० टक्क्यांनी घटणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
देशात कापसाचे (Kapus Lagvad) सरासरी पेरणी क्षेत्र १२४ लाख हेक्टर तर महाराष्ट्राचे पेरणी क्षेत्र सरासरी ४२ लाख हेक्टर आहे. उर्वरित कापूस उत्पादक आठ राज्यांमधील पेरणी क्षेत्र महाराष्ट्रातील क्षेत्राच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी आहे. सन २०२१-२२ च्या हंगामात कापसाच्या दराने प्रतिक्विंटल ११ हजार रुपयांची पातळी ओलांडली हाेती.
यापूर्वी आणि नंतर कापसाचे दर एमएसपी दराच्या आसपास राहिले. कृषी निविष्ठांची दरवाढ व प्रतिकूल हवामानामुळे कापसाचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढाही दर मिळाला नाही. कापसाचे पेरणी क्षेत्र घटल्यास उत्पादन घटेल. मागणी व वापर स्थिर राहिला तरी दर दबावात ठेवण्याचे कारस्थान सुरूच राहणार आहे.
मका व तुरीला प्राधान्य
मागील दाेन वर्षांपासून मका व तुरीला एमएसपीपेक्षा अधिक दर मिळाला आहे. मक्याच्या पिकाचा कालावधी १०० ते १२० दिवसांचा असल्याने शेतकऱ्यांना किमान दाेन पिके घेता येतात. तुरीच्या पिकाचा कालावधी १५० ते १८० दिवसांचा असला तरी तुरीला किमान तीन ते चार बहार येतात. कापसाच्या तुलनेत या दाेन्ही पिकांचा उत्पादन खर्च कमी असल्याने शेतकरी या पिकांकडे वळणार आहेत.
आकडेवारीचा घाेळ
देशात कापूस उत्पादनाची याेग्य आकडेवारी गाेळा करण्याची प्रभावी यंत्रणा नाही. दरवर्षी महाराष्ट्रात किमान १०० ते ११५ लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेत असले तरी ते ७७ ते ८५ लाख गाठींच्या आसपास दाखविले जाते. कापड उद्याेजकांच्या काही संस्था याच चुकीच्या आकडेवारीचा कापसाचे दर दबावात ठेवण्यासाठी वापर करतात.
कापसाचे पेरणी क्षेत्र (लाख-हेक्टर)
वर्ष | देश | महाराष्ट्र |
२०२४-२५ | ११२.९४७ | ४०.८६० |
२०२३-२४ | १२३.४२३ | ४२.२२३ |
२०२२-२३ | १२७.५७२ | ४२.२२४ |
२०२१-२२ | ११९.६६४ | ३९.४१० |
२०२०-२१ | १२९.४६८ | ४२.२५१ |
२०१९-२० | १२७.६७४ | ४४.०५२ |
२०१८-१९ | १२०.६४१ | ४१.२३३ |