एकीकडे उन्हाची काहिली झाली असून यंदाच्या हंगामातील रानमेवा देखील बाजारात येऊ लागला आहे. राज्यातील छोट्या छोट्या शहरांमध्येच नव्हे तर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी देखील रानमेवा विक्रीसाठी दाखल झाला आहे. सध्या मुंबईतील वर्दळीच्या परिसरात आजुबाजुंच्या खेड्यापाड्यातून आलेला रानमेवा चांगलाच भाव खाऊन जात आहे. यात करवंद असतील, तोरणं असतील तसेच अक्षय तृतीयेसाठी लागणारी पळसाची पाने असतील आदींनी मुंबईकरांना भुरळ घातली आहे.
उन्हाळ्याचा हंगाम सुरु असून या दिवसांत रानमेवा खाण्याची मजा काही औरच असते. या दिवसात आंबे, करवंद, आळव, तोरणं आदी फळ पिकू लागतात. काही बहरण्याच्या स्थितीत असतात. मात्र हाच रानमेवा अनेकांच्या रोजगाराचे साधनही होत असतो. मुळात ही सगळी फळे रानावनात बहरतात. त्यामुळे ग्रामीण भागातच ही फळे जवळून चाखायला मिळतात. मात्र ग्रामीण भागातील मंडळी याच रानमेव्यातून उदरनिर्वाहाचे साधन तयार करतात. हाच रानमेवा तालुक्याच्या ठिकाणी मोठ मोठ्या शहरात विक्रीसाठी आणला जातो. मुंबईत देखील सध्या या रानमेव्यांची क्रेझ चांगलीच वाढली आहे.
खरं तर मुंबईच्या आजुबाजुंच्या ग्रामीण भागातील आदिवासी पहाटे उठून जंगलातून हा रानमेवा गोळा केला जातो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने यात शाळेतील विद्यार्थीही सहभागी होत असतात. या रानमेवामुळे आदिवासी बांधवाना रोजगार मिळत असतो. म्हणूनच सध्या मुंबईच्या रस्त्यारस्त्यावर रानमेवा दिसू लागला आहे. साठीच्या अथवा पन्नाशीच्या घरात असलेल्या आजीबाई एका टोकरीत सगळा रानमेवा जमा करून कुठं रेल्वे स्थानकाच्या बाहेर, कुठे टॅक्सी स्टॅन्डजवळ, तर कुठे बाजाराच्या ठिकाणी दिसू लागला आहे. यात पळसाच्या पानात करवंदाचा वाटा घालून ठेवलेला दिसतो. हा वाटा मुंबईच्या रस्त्यावर केवळ वीस रुपयांना मिळतो आहे, तर पळसाच्या पानांचा वाटा दहा रुपयांना मिळतो आहे.
आदिवासी बांधवाच्या उत्पन्नाचे साधन
नाशिकसह मुंबई शहराच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या अदिवासीं बांधवांचे उत्पन्नाचे साधन म्हणून डोंगरातील रानमेवा आजही आधार वाटतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पटकन तोंडात टाकता येणारा तसेच शरीराला आणि मनाला गारवा देणार्या या रानमेव्याला अधिक मागणी असते. सध्या करवंद, आळव , तोरणं पिकू लागली असून कच्च्या करवंदांचा ठेचा करण्यावर किंवा आता लोणचं करण्यावर भर दिला जात आहे. मुंबईकर सध्या करवंदाच्या प्रेमात असून तोरणं हा सहसा फारसा प्रचलित नाही. तर दुसरीकडे अक्षय तृतीय सणाला लागणाऱ्या पळसाच्या पानांना देखील मागणी वाढली आहे.